‘एस’ आकारातील वळण काढण्याचे कामही रखडले
पुणे – सातारा महामार्गावर अपघातांचे कारण ठरत असलेल्या खंबाटकी बोगद्याबाहेरील “एस’ आकारातील वळण काढण्याचे काम आणि सहा लेनचा बोगदा करण्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन 14 महिने झाले तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेली नाही. त्यामुळे या कामाला मुहूर्त कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे काम केले जाणार आहे. साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेला येण्यासाठी खंबाटकी बोगद्याचा वापर करावा लागतो. या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर “एस’ आकाराचे वळण व तीव्र उताराचा रस्ता आहे. त्यामुळे बोगद्यातून वेगात आलेल्या वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्राणांतिक अपघात झाले असून, 7 ते 8 अपघात भीषण झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यात सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोव्हेंबर 2015 मध्ये हे वळण सरळ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संबंधित कंपनीला याबाबतची सूचनाही देण्यात आली.
त्या ठिकाणी केवळ रस्त्याची रुंदी वाढविली असून त्यामुळे “एस’ वळणात फारसा फरक पडलेला नाही. परिणामी, हे “एस’ आकाराचे वळण वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या ठिकाणी संपूर्ण नवीन रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी “एस’ आकाराचे वळण काढणे व नवीन बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन डिसेंबर 2018 मध्ये झाले. मात्र, अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
साताऱ्याला जाण्यासाठी सध्या खंबाटकी घाटातून जावे लागते. याठिकाणी नवीन बोगदा केला जाणार आहे. हा बोगदा सहा लेनचा होणार आहे. म्हणजेच, या बोगद्यातून साताऱ्याला जाणाऱ्या वाहतुकीबरोबरच पुण्याच्या दिशेला येणाऱ्या वाहतुकीसाठीही तीनलेन प्रस्तावित आहेत. त्यामुळे येत्या काळात या ठिकाणी दोन बोगदे होणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या बोगद्याच्या उजव्या बाजूस हा बोगदा होणार आहे.
ही कामे होणार
– खंबाटकी घाटात सहा पदरी बोगदा (तीन लेनचे दोन बोगदे)
– खंबाटकी घाटातील धोकादायक “एस’ वळण काढणार
– बोगद्याच्या विस्तारीकरणाची लांबी 6.46 कि.मी.