एक लाखाची शेवटची कुस्ती; परराज्यांतील मल्लांची हजेरी
श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – येथील ग्रामदैवत संत शेख महंमद महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा शनिवारी पार पडला. निकाली कुस्त्या करणाऱ्या मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. एक लाखाची शेवटची कुस्ती पुणे येथील सागर बिराजदार व कोल्हापूर येथील संतोष दुरवल यांच्यात झाली. मोठ्या रकमेच्या कुस्त्यांनी आखाड्यात चांगलाच रंग भरला होता.
शनिवारी दुपारी तीन वाजता महंमद महाराजांच्या मठाजवळ कुस्त्या सुरू झाल्या. सायंकाळी आठ वाजेपर्यंत कुस्त्या सुरू होत्या. गटानुसार जोडी ठरवल्याने दरवर्षी आखाड्यात होणारा गोंधळ यावेळी झाला नाही. पर्यायाने कुस्तीप्रेमीनी कुस्त्यांचा मनमुराद आनंद लुटला. विजेत्या मल्लांना यात्रोत्सव समितीच्या वतीने बिदागी देण्यात आली. या आखाड्यात नगर जिल्ह्यासह, महाराष्ट्र व परराज्यांतून मल्लांनी हजेरी लावली. खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉंझ पदक पटकविणारा गणेश बायकर याचा कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंतराव धुमाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंच म्हणून बाबासाहेब भोस, गोपाळ मोटे, पोपट खेतमाळीस, अशोक आळेकर, बंडू दहातोंडे यांनी काम पाहिले. कुस्त्यांचे धावते वर्णन नानासाहेब कोथिंबिरे यांनी केले.
माजी मंत्री बबनराव पाचपुते, कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, सदाशिव पाचपुते, तहसीलदार महेंद्र माळी, पृथ्वीराज नागवडे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, प्रा. तुकाराम दरेकर, मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, बापूसाहेब गोरे, अन्सार पठाण, उप महाराष्ट्र केसरी संदीप बारगुजे, अरविंद माने आदींसह तालुक्यातील नेते मंडळी व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कुस्त्या ठरल्या लक्ष्यवेधी..
शेवटच्या तीन कुस्त्या मोठ्या बक्षिसाच्या होत्या. यामध्ये 51 हजारांची कुस्ती सूरज पालवे (काष्टी) व अक्षय गरुड (पुणे) यांच्यात झाली. 75 हजारांची कुस्ती अनिल ब्रम्हे (राहुरी) व अण्णा गायकवाड काष्टी यांच्यात झाली, तर शेवटची एक लाखाची कुस्ती सागर बिराजदार (पुणे) व संतोष दुरवल (कोल्हापूर) या मल्लांत झाली. तिन्ही कुस्त्यांत मल्लांनी टाकलेले डाव-प्रतिडावा उपस्थितांचे नजर रोखून धरणारे होते. अंधार पडायला लागल्याने पंचांनी या कुस्त्या बरोबरीत सोडविल्या.