इच्छापत्र तयार करताना…

इच्छापत्र, वारसापत्र, मृत्युपत्र हे मालमत्तेच्या वाटणीवरून किंवा वारसदारांवरून निर्माण होणाऱ्या वादाला टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. काहीवेळा चुकांमुळे देखील इच्छापत्र नाकारलेही जावू शकते. त्यामुळे इच्छापत्र तयार करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती इथे सांगता येईल. अर्थात घरातील कर्त्या पुरुषाला मृत्यूपत्र तयार करण्याची इच्छा नसते, मात्र भविष्यात अनाठायी वाद निर्माण होऊ नये यासाठी अनिच्छेने इच्छापत्राची तयारी करावी लागते. अर्थात इच्छापत्र तयार केले नाही तर त्यावरून वारसदारांत वाद हाण्याची शक्‍यता अधिक असते. इच्छापत्र संपूर्णपणे शुद्धीवर, साक्षीदाराच्या समोर करणे अपेक्षित असते. याबाबत भारतीय वारसा हक्क 1925 च्या कायद्यात तरतूदी दिल्या आहेत. इच्छापत्र तयार करण्यापूर्वी या तरतुदींचे अवलोकन करणेही गरजेचे आहे.

वकिलाची मदत घ्या
जर आपण अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम असाल तर साध्या कागदावर देखील दोन साक्षीदारासमोर तयार केलेली वाटणी देखील कायदेशीररित्या मान्य होते. त्यामुळे मालमत्तेची वाटणी करताना त्यावर दोन साक्षीदारांना आपल्या देखत सही करून त्याखालीही आपली सही असणे गरजेचे आहे. जर मालमत्ता वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर वकिलाची सेवा घेणे महत्त्वाचे ठरेल.

साक्षीदार
इच्छापत्र तयार करताना उपयुक्त साक्षीदार हा फॅमिली डॉक्‍टर किंवा ज्याचा सन्मान संपूर्ण कुटुंब करत असेल असा व्यक्ती असावा. एखाद्याने वारसापत्रावरून शंका उपस्थित केली तर न्यायालय साक्षीदारास पाचारण करते आणि वारसापत्राबाबत विचारणा करते. म्हणून साक्षीदाराची निवड ही अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. जर कामाच्या वेळी किंवा मोक्‍याच्या क्षणी साक्षीदार भेटत नसेल किंवा अन्य ठिकाणी असेल तर अशा साक्षीदाराचा काहीच उपयोग नाही. ही बाब एक्‍झीक्‍यूटरला देखील लागू होते. जर त्याची नियुक्ती वारसपत्रात केली नसेल तर न्यायालय एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते. मात्र कुटुंबातील एखाद्या माहितगार व्यक्तीला एक्‍झिक्‍यूटर करणे उत्तम ठरेल.

नोंदणी
वारसापत्राची नोंदणी करणे बंधनकारक नाही, मात्र त्यांची नोंदणी करणे कायदेशीररित्या फायद्याचे ठरेल. वारसापत्रात एखादा आक्षेप घेतला आणि ते वारसापत्र नोंदणीकृत असेल तर आपली बाजू भक्कम राहते. नोंदणीकृत वारसापत्र संपूर्णपणे शुद्धीवर आणि सदसदविवेक बुद्धीला स्मरून केल्याचे सिद्ध होते. जर वारसापत्राला विरोध होण्याची तसेच आक्षेप घेण्याची शक्‍यता वाटत असेल तर डॉक्‍टरच्या उपस्थितीत वारसापत्र तयार करावे. त्याचबरोबर त्याची व्हिडिओग्राफी देखील तयार करता येऊ शकते.

अटी निश्‍चित करा
वारसापत्र तयार करताना आपल्या मालमत्तेचा लाभ पत्नीला, निपुत्रिक व्यक्तीला किंवा अन्य जवळच्या व्यक्तीला मिळावा असे जर वाटत असेल तर तशा अटींचा समावेश करावा. उदा. जर आपल्या वयस्क पत्नीला मालमत्तेचा अधिकार अगोदर मिळावा असे जर वाटत असेल तर तसा उल्लेख वारसापत्रात करायला हरकत नाही. त्यांच्या निधनानंतरच अन्य वारसदारांना त्यावर हक्क मिळेल, अशी तरतूद वारसापत्रात करून ठेवायला हवी.

एकच उत्तराधिकारी
मालमत्तेचा उत्तराधिकारी सोपा आणि सुटसुटीत करण्यासाठी एकच मार्ग आहे. वारसापत्रातंर्गत एकाच व्यक्तीला नॉमिनी आणि लाभार्थी नेमण्याचा विचार करावा. जर एखादा व्यक्ती वारसापत्रावर आक्षेप घेत असेल तर मालमत्तेचा ताबा हा नामनिर्देशित व्यक्तीकडे राहील.

सर्व मालमत्तेचा उल्लेख करावा
कदाचित काही वेळा वारसापत्रात उल्लेख असलेल्या वारसदारांना अन्य मालमत्तेची माहिती नसते. त्यामुळे वारसापत्र तयार करणाऱ्यांनी एकूण मालमत्तेचा उल्लेख करायला हवा. वारसापत्रात चल-अचल मालमत्तेसंदर्भात संपूर्णपणे विस्ताराने माहिती नमूद करणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
2 Comments
  1. Ajay tode says

    Pattern ekhade udhaharan

  2. Ajay tode says

    Please show written example ichapatra

Leave A Reply

Your email address will not be published.