लोणी काळभोर – महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात मंजूर करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांनी तीर्थक्षेत्र रामदरा रस्ता मंजूर करण्यासाठी काय पाठपुरावा केला हे जनतेसमोर मांडावे, असे आव्हान आमदार अशोक पवार यांनी दिले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 88 लाख रुपये मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीचे स्थानिक लोकप्रतिनिधी व भाजपने प्रयत्न केले आहेत. आमदारांनी या कामाचे श्रेय घेऊ नये, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केली होती. त्यामुळे अशोक पवार यांनी नाव न घेता ही टीका केली.
यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, अनिल टिळेकर, पुणे जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा किरण काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, भुजंग काळभोर, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, आनंदा काळभोर, सूर्यकांत गवळी, देवानंद काळभोर, सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच ललिता काळभोर, ग्रामपंचायत सदस्य सविता लांडगे, प्रियांका काळभोर, माधुरी काळभोर, भारती काळभोर, ज्योती काळभोर, संगीता काळभोर, बकुळा केसकर, राजाराम काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, अमित काळभोर, सागर काळभोर, सचिन काळभोर, गीताराम लांडगे, ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यातील काही आमदार तीन लाख लोकसंख्येमधून निवडून येतात. आपल्या मतदारसंघात केवळ वाघोली परिसरच साडेतीन लाख लोकसंख्येचा आहे. त्यामुळे श्रेयवाद करण्याची गरज नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पाच वर्षे कंत्राटदार करणार आहे. रस्त्याचे काम दर्जेदार नसेल तर परिसरातील कुठल्याही नागरिकाने काम थांबवावे. शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर भरपूर प्रेम केले आहे. त्यामुळे जात पात, पक्ष न बघता काम केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राखपसरे यांनी तर उपस्थितांचे आभार उपसरपंच ललिता काळभोर यांनी मानले.
या रस्त्याच्या कामाचे श्रेय कुणीही घ्या; परंतु रस्ता करा. या रस्त्यासाठी ज्याने मदत केली त्याला उद्घाटनाला बोलावले आहे. जनतेला माहिती आहे कुणी रस्ता मंजूर केला. रस्ता तुम्ही मंजूर केला असेल तर तुम्हीही भूमिपूजन करा; परंतु चांगल्या दर्जाचा रस्ता होऊ द्या. रस्त्याचे काम अडवू नका.
-युगंधर काळभोर, माजी सभापती