नवी दिल्ली – केंद्रीय सुरक्षा संस्थांनी अभिनेत्री कंगना रणावतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निमलष्करी दलाच्या माध्यमातून कंगनाला ही सुरक्षा दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. वाय प्लस दर्जाच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जर सुरक्षा दिली गेली तर त्याच्या सुरक्षेसाठी दहा सशस्त्र कमांडो तैनात केले जातात.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत वादळ आलेले असून रोज शाब्दिक चकमकी झडू लागल्या आहेत. त्यात बॉलिवूड आणि अंमली पदार्थांचे कथित रॅकेट यांच्या कनेक्शनबाबतही चर्चा झडू लागल्या असून कंगना रणावत पहिल्या दिवसापासून आक्रमक स्वरूपाची विधाने करत आहे. त्यामुळे तिच्या जिवाला धोका निर्माण झाला असून तिला सुरक्षा दिली जावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यानुसार तिला आता ही सुरक्षा देण्यात आली आहे.
थोडक्यात सुरक्षेबाबत….
भारतात एखादा नेता, अधिकारी अथवा कोणी व्यक्तीच्या जिविताला धोका निर्माण झाला असेल तर त्याचा आढावा घेतला जातो व त्यानुसार त्याला सुरक्षा प्रदान केली जाते. धोक्याच्या पातळीचा अंदाज घेत झेड प्लस, झेड आणि वाय श्रेणी अशा स्वरूपाची ही सुरक्षा असते. प्रामुख्याने केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे आणि राज्यांच्या उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, प्रख्यात व्यक्ती अथवा निवृत्त माठे अधिकारी यांना सामान्यत: या प्रकारचे संरक्षण कवच पुरवले जाते. अशा प्रकारचे सुरक्षा कवच असणाऱ्या व्यक्तींची आजचही देशातील संख्या 450 इतकी आहे. यातील 15 जणांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा आहे.
झेड प्लस श्रेणी:
यात 36 जण संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. यातील दहा एनएसजी आणि एसपीजीचे कमांडो असतात. उर्वरित सुरक्षा रक्षक हे पोलीस दलातील असतात. अत्यंत महत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते. या सुरक्षेच्या पहिल्या स्तरात एनएसजीचे कमांडो तर दुसऱ्या स्तरात एसपीजीचे अधिकारी असतात. याशिवाय आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवानही सुरक्षेसाठी तैनात असतात. झेड प्लस श्रेणीच्या अंतर्गत पंतप्रधान, माजी पंतप्रधान यांना एसपीजी कमांडोंचे सुरक्षा कवच दिले जाते.
झेड श्रेणी:
या श्रेणी अंतर्गत 22 जण सुरक्षेसाठी तैनात केले जातात. त्यात प्रामुख्याने दिल्ली पोलीस, आयटीपी आणि सीआरपीएफच्या अधिकारी व जवानांचा समावेश असतो. ही सुरक्षा मिळालेल्या व्यक्तीच्या ताफ्यात एका एस्कॉर्ट वाहनाचाही समावेश असतो.
वाय श्रेणी:
या श्रेणीत 11 सुरक्षा रक्षक तैनात असतात. यात दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्सचाही (पीएसओ) समावेश असतो. तर एक्स श्रेणीच्या अंतर्गत दोन जण सुरक्षेसाठी तैनात असतात. यात एक पीएसओ असतो.