मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच अभिनेत्री ‘हेमांगी कवी’ आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सोशलवर तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. हेमांगीला सोशलवर शेअर केलेल्या पोस्टमुळे कधी नेटकऱ्यांकडून दाद मिळते तर कधी तिच्यावर टीकाही केली जाते. दरम्यान, नुकतंच हेमांगीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये तिने खास करून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बद्दल स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेमांगी नवी पोस्ट अनेकांना आवडली, पण अनेकांनी मात्र अभिनेत्रीला नेमीप्रमाणे ट्रोल देखील केल्याचं दिसून आलं आहे.
हेमांगी आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो.
मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!! सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे! स्वतःच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो.
उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए! पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या 57 व्या वर्षी जर तुम्ही 20-22 वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला! बाकी… झूमे जो पठान मेरी जान, महफ़िल ही लूट जाए! You were, You are & You will be forever…Baazigar! असं हेमांगी म्हणाली आहे.
सध्या सर्वत्र ‘पठाण’ सिनेमाची चर्चा आहे. अभिनेता शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बॉक्स ऑफिसवर देखील कोट्यवधींचा गल्ला गोळा करताना दिसत आहे.