नवी दिल्ली : जगातील सर्वच लहान मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे लपाछपी. मात्र हा खेळ खेळताना लहान मुलांच्या सोबत घरातील मोठी व्यक्ती सोबत असणे कायम गरजेचे असते. याचे उत्तम उदाहरण नुकतेच समोर आले आहे. बांगलादेशच्या एका १५ वर्षीय मुलाला लपाछपीचा खेळ खेळणे चांगलेच महागात पडले आहे. कारण हा खेळ खेळता-खेळता एक मुलगा चक्क स्वतःच्या देशातून दुसऱ्या देशात पोहचल्याची घटना उघड झाली आहे.
त्याच झालं असं बांगलादेशच्या चटगांव येथे काही मुले लपाछपीचा खेळ खेळत होते. यावेळी एका मुलाने लपण्यासाठी बंदरावर उभ्या असलेल्या शिपिंग कंटेनरची जागा निवडली आणि तिथेच तो अडचणीत सापडला. आपण लपण्यासाठी निवडलेली जागा आपल्याला संकटात नेणार आहे, याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. बांगलादेशमधील ११ जानेवारीची ही घटना आहे. लपाछपी खेळत असताना १५ वर्षांचा फहीम रेल्वेच्या शिपिंग कंटेनरमध्ये जाऊन लपला. त्यावेळी त्याला कल्पना नव्हती की त्याच्यासोबत पुढे काय होईल. कंटेनरमध्ये लपल्यानंतर फहीमला कंटेनरमधून बाहेर पडता आले नाही.
15 year old boy from Bangladesh was apparently playing hide and seek with his friends, he decided to hide in a shipping container, he fell asleep and was found 6 days later in Malaysia. pic.twitter.com/dVJSuEWNDn
— Mike Rotchburns (@M_Rotchburns) January 28, 2023
११ जानेवारीला हे शिपिंग कंटेनर आपल्या नियोजित प्रवासाला निघालं आणि १७ जानेवारी रोजी मलेशियाच्या पोर्ट क्लांग येथे पोहोचले. तब्बल सहा दिवसांच्या प्रवासानंतर फहीम देखील कंटेनरसोबत मलेशियाला पोहोचला होता. या दरम्यान न खाता-पिता तो कंटेनरमध्येच होता. जेव्हा कंटेनरमधून त्याला बाहेर काढण्यात आले तेव्हा त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
मलेशियाच्या बंदरावर पोहोचल्यानंतर फहीमला बाहेर काढले गेले. त्याने सांगितले की, सहा दिवस तो कंटेनरच्या बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. त्याने अनेकवेळा कंटेनरवर लाथा मारल्या. जोरजोरात ओरडला. मदतीसाठी याचना केली. मात्र त्याच्या मदतीला कुणीही आले नाही. जेव्हा त्याला कंटेनरच्या बाहेर काढले तेव्हा फहीम खूप घाबरलेला होता. सहा दिवस उपाशी राहिल्यामुळे भूकेने अतिशय व्याकूळ झालेल्या फहीमला बंदरावरील कर्मचाऱ्यांनी खायला दिले.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलेशियाच्या बंदरावरील कर्मचाऱ्यांना सुरुवातीला हे प्रकरण मानवी तस्करीचे वाटले होते. मलेशिया पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्यांना तथ्य समजले. मलेशियाचे गृहमंत्री दातुक सेरी सैफुद्दीन यांनी माध्यमांना बोलताना या मुलाची माहिती दिली. तसेच त्याच्यावर उपचार करुन त्याला सुरक्षित पुन्हा बांगलादेशला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.