70 वर्षांत कॉंग्रेसने काय केले?

स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने निर्माण झालेला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आज आपला वर्धापन दिन साजरा करीत आहे.

सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळ म्हणून उदयाला आलेल्या कॉंग्रेस पक्षाचे नंतर राजकीय पक्षात रूपांतर झाले. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वांतत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणात आपले अभूतपूर्व ठसा कॉंग्रेसने उमटवला आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्ये जपणारा राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेसची आजही ओळख कायम आहे.

स्वांतत्र्याच्या ओढीमुळे अखिल भारतीय कॉंग्रेस या संघटनेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली. आज कॉंग्रेस पक्षाचा 136वा स्थापना दिवस आहे.

आजच्या घडीला कॉंग्रेस काहीशी राजकीयदृष्ट्या कमकुवत झाली असल्याचे दिसत असले तरी कॉंग्रेसचा इतिहास मात्र न पुसला जाणारा आहे. कॉंग्रेसचे कार्य हे अबाधित राहणार आहे. स्वांतत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीतही कॉंग्रेस पक्षाचेच महत्त्वपूर्ण योगदान आहे.

राजकीय डावपेचांमध्ये आज कॉंग्रेस पक्ष काहीसा मागे पडत असला तरी भारतीय संस्कृतीची जपणूक करणारा पक्ष म्हणूनही कॉंग्रेस पक्ष ओळखला जातो.

गावागावांत आजही कॉंग्रेस पक्षाशी नाळ जुळलेली माणसं भेटतात. आजही आजीआजोबांच्या तोंडून कॉंग्रेसचे तोंडभरून कौतुक ऐकायला मिळते. कॉंग्रेसला खेड्यागावांतून आजही मोठा जनाधार लाभला आहे. खेडेगांवाची उन्नती व्हावी यासाठी कॉंग्रेस पक्षाने केलेली महत्तम कामगिरी नजरेआड करता येणार नाही.

भारताला दरिद्रीच्या दरीतून बाहेर काढण्याचेही काम कॉंग्रेस पक्षाने केलेले आहे. जेव्हा भारत एकूण लोकसंख्येचे पोट भरण्यास असमर्थ होता तेव्हा कॉंग्रेसप्रणीत सरकारने 1965-66 साली हरित क्रांतीला जन्म दिला. हरित क्रांतीमुळे भारत देश सुजलाम सुफलाम झाला. त्यामुळे भारत आज एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि एकशे तीस कोटी लोकांचे पोट भरण्यास भारत आज समर्थ आहे. आज अन्नधान्यासाठी भारताला कुठल्याही देशावर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही, यामागचा दृष्टीकोन कॉंग्रसचाच आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात अशिक्षितांचे प्रमाण एकूण लोकसंख्येपेक्षा खूपच अधिक होते. मूठभर जनता सुशिक्षित होती. आज भारताने साक्षरतेतही आघाडी घेतली आहे. किमान प्राथमिक शिक्षण विनामूल्य दिल्यामुळे आज भारत सुशिक्षित देश म्हणून ओळखला जातो.

स्वातंत्र्यानंतर भारतात गरिबी, दारिद्य्र होते. कॉंग्रेसच्या पंचवार्षिक योजनांमुळे आज भारतातील गरिबीचे प्रमाण कमी होऊन नवा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे, ज्यामुळे लोकांचे राहणीमान उंचावले आहे.

स्वातंत्र्यानंतर भारताने औद्योगीकरणानंतर उद्योग क्षेत्रातही बाजी मारली आहे. आज भारतात उद्योग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई, बंगळुरू सारखे शहरे उभी राहिली आहेत.

स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञानातही प्रगती केली आहे. भारत अगोदर अनेक देशांवर अवलंबून होता आज भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वतःच्या पायावर उभा आहे, याचा भक्‍कम पाया कॉंग्रेसच्या काळातच रोवला गेला.

रस्ते, रेल्वे, विमानसेवा, जहाज या दळणवळणातही भारताने भरारी घेतली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक खेडेगावे पक्‍क्‍या सडकांनी जोडली गेली.

संरक्षण क्षेत्रातही भारत आज आघाडीवर आहे. 1962 चे चीन सोबतचे युद्ध आणि नंतर पाकिस्तानसोबतचे युद्ध यामुळे कॉंग्रेसने त्याकाळी भारतीय लष्कर मजबूत करण्याकडे भर दिला.

परराष्ट्र धोरणातही नेहरू यांनी स्वीकारलेल्या पंचशील तत्त्वामुळे भारताला सुरुवातीच्या काळात चांगला फायदा झाला. त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरणाला एक वेगळी दिशा मिळाली.

कॉंग्रेसने स्वांतत्र्यानंतर जवळपास सर्वच क्षेत्रात मागसलेल्या असलेल्या भारत देशात आज प्रगतीपथावर आणून सोडले आहे. येथून पुढे जाण्याची वाट आता स्वातंत्र्यानंतर होती तशी बिकट वाट नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षांना भारत विकसित करण्यास कॉंग्रेसच्या कार्याचा चांगलाच लाभ होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.