नवी दिल्ली: देशात करोनाच्या लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे देशातील काही ठिकाणच्या लसीकरणाचा वेग खूप मंदावला आहे. त्यामुळे सध्या देशामध्ये अशा नागरिकांची संख्या खूप झाली आहे ज्यांना करोनाविरोधातील लसीचा पहिला डोस मिळाला आहे. मात्र ते दुसरा डोस मिळण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर संशोधकांनी उत्तर दिल्याने सर्वांना समाधान मिळणार आहे.
देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला अद्याप करोनावरील लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. लसीकरणाला होत असलेल्या उशिरामुळे वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. करोनावरील लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर हे अधिक असेल तर ३०० टक्के अधिक अँटिबॉडी निर्माण होण्याची शक्यता असते, अशी माहिती संशोधनामधून समोर आली आहे.
एका अहवालानुसार लसीच्या दुसऱ्या डोसमध्ये होणारा उशीर सप्लाय आणि इम्युन सिस्टिम या दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. संशोधनामधून समजले की, जर लसीचा दुसरा डोस उशिराने प्राप्त झाला तर विषाणूसोबत लढणाऱ्या अँटिबॉडीचा स्तर २० ते ३०० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अशा परिस्थितीत हे नवे संशोधन सिंगापूर आणि भारतासह अनेक देशांसाठी फायदेशीर ठरू शकते.
सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे येथे दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवडे करण्यात आले आहे. त्यापूर्वी हे अंतर ३ ते ४ आठवडे एवढेच होते. दरम्यान, भारतामध्येसुद्दा लसीच्या उपलब्धतेचे आकडे योग्यप्रमाणे समोर दिसत नाही आहेत. येथेही लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा सल्ला दिला जात आहे. कमी लसी आणि अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये हे धोरण उपयुक्त ठरू शकते, असा दावा केला जात आहे.
लसीचा पहिला डोस इम्युन सिस्टिम तयार करतो आणि विषाणूविरोधात अँटिबॉडी तयार करायला सुरुवात करतो. अशा परिस्थितीत या प्रक्रियेला जेवढा अधिक वेळ मिळे तेवढी चांगली प्रतिक्रिया दुसऱ्या डोसमधून मिळते, असे संशोधनामधून समोर आले आहे. दरम्यान, लसीच्या दोन डोसमधील जास्त अंतर हे सर्वच लसींच्याबाबतीत फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.