मुंबई – मराठी इंडस्ट्रीतील स्टायलिश हिरो अशी ओळख असलेले अभिनेते रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले. मावळ तालुक्यात आंबी येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. हवा पालटासाठी रविंद्र महाजनी हे अनेक दिवसांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने सोसायटीधारकांनी पोलिसांना बोलावले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले.
फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. भाड्याने फ्लॅट घेऊन ते एकटेच तेथे राहात होते.तर त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी हा मुंबईला राहतो. रविंद्र यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र त्यांचा अशा अवस्थेत मृतदेह आढळल्याने त्यांच्या कुटुंबियांसह सिनेसृष्टीला देखील धक्का बसला आहे.
काय घडलं नेमकं ?
शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडाला असता महाजनी यांचा मृतदेह आढळला. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,सकाळपासून बिल्डिंगमध्ये दुर्गंधीचा वास येत होता मात्र अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर दुपारी वास वाढल्याने काही जणांनी वास नेमका कुठून येतोय हे तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३११ मधून वास येत असल्याचे समजले जो कि महाजनी यांचा फ्लॅट होता.
त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले आणि त्यांनी दरवाजा तोडाला. तेव्हा रवींद्र महाजनी हे फ्लॅटमध्ये जमिनीवर पडलेले आढळले. अंघोळीनंतर कपडे बदलताना तोल जाऊन ते पडले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह तळेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.