नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूल यांच्यातील निवडणुकांपूर्वीचा रणसंग्राम निकालांनंतरही कायम आहे. येथे भाजपचे आव्हान मोडीत काढत तृणमूलने सलग तिसऱ्यांदा सत्तेच्या चाव्या काबीज केल्या आहेत. मात्र निवडणूक निकालांनंतर राज्यात जाळपोळ व हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.
तृणमूलच्या कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तृणमूलने हे आरोप फेटाळून लावत भाजप नेतेच हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचं म्हटलंय. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच भाजपने माणिक मोइत्रा नामक एका इसमाचा खून करण्यात आल्याचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचे आता उघडकीस आल्याने भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी भाजपाच्या बंगाल पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र भाजपतर्फे माणिक मोइत्रा म्हणून ज्या व्यक्तीचा फोटो वापरला ते इंडिया टूडेचे पत्रकार अभ्रो बनर्जी असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे भाजपचा खोटेपणा उघडकीस आला असून त्यांना हा व्हिडीओ हटवावा लागला आहे.
दरम्यान, बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाने ९ लोकांच्या नावाची यादी जारी केली आहे. ज्यात मोमिक मोइत्रा, मिंटू बर्मन यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु माणिक मोइत्रा नावाने कोणाची ओळख पटली नाही. बऱ्याच विवादानंतर भाजपच्या ट्विटर खात्यावरून 5.28 मिनिटांचा हा व्हिडीओ अखेर हटवण्यात आला आहे.
…आणि अभ्रो बनर्जी म्हणाले मी अद्याप जिवंत आहे
भाजपतर्फे ट्विट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मोमिक मोइत्रा म्हणून अभ्रो बनर्जी यांचा व्हिडीओ वापरण्यात आला होता. ही गोष्ट लक्षात येताच अभ्रो बनर्जी यांनी आपल्या ट्विटर खात्याद्वारे आपण (अद्याप) जिवंत असल्याचं म्हणत भाजप आयटी सेलची फिरकी घेतली.
भाजपची नाचक्की
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसाचार करीत असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपची या व्हिडीओमुळे चांगलीच नाचक्की झाली. या प्रकारामुळे समाज माध्यमांवर अनेकांनी भाजपच्या हिंसाचाराच्या आरोपांवरच प्रशचिन्ह उपस्थित केले आहे.
I am Abhro Banerjee, living and hale and hearty and around 1,300 km away from Sitalkuchi. BJP IT Cell is now claiming I am Manik Moitra and died in Sitalkuchi. Please don’t believe these fake posts and please don’t worry. I repeat: I am (still) alivehttps://t.co/y4jKsfx8tI pic.twitter.com/P2cXJFP5KO
— Abhro Banerjee (@AbhroBanerjee1) May 6, 2021