पुणे: अंजुमन ईस्लाम नावाचा अंदाजे २२ वर्षाचा युवक साधारणतः मार्चच्या दुस-या आठवढ्यात पश्चिम बंगाल मधुन मुंबईला इंडियन आयडॉल होण्याचे स्वप्न उराशी घेवुन आला होता. दरम्यान मुंबईतील बहुतेक आस्थापना कोविड १९ अनुशंगाने बंद होत होत्या. व त्यामुळे या तरुणाची ऑडिशनची प्रक्रिया खोळांबली होती.
हा तरुण अतिशय गरीब परिस्थिती मधला होता व गाण्याची मात्र त्याला प्रचंड आवड होती. जवळ मोजकेच पैसे असल्याने या तरुणाने वारजे पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्याव दांगट वस्ती येथील त्याच्या मित्राशी संपर्क केला व काही दिवस निवासाची व्यवस्था झाली.परंतु लॉकडाऊन कालावधी वाढतच गेल्याने अखेर त्याच्या मित्राने त्याला घराबाहेर काढले व हा तरुण रस्त्यावर आला.
एकेदिवशी हा तरुण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना दिसला. एका कोपऱ्यात हा तरुण रडत होता. त्याच्याशी बोलताना असे समजले की, हा गेले आठवडाभर वारजे हायवे चौकामध्ये असलेल्या तंबूमध्ये झोपत होता व वारजे पोलीस ठाण्याच्या वतीने जे दररोज अन्न वाटप होते त्यातच तो पोट भरत होता.
तरुण सातत्याने मला माझ्या मूळ गावी जायची व्यवस्था करा असे विनवत होता. त्यानंतर अशोक कदम यांनी गोपनीय शाखेच्या कर्मचारी संतोष भापकर व सद्दाम तांबोळी व एसपीओ राहुल पाटील, प्रतिक काकडे तातडीने सूचना केल्या व विशेष शाखेशी संपर्क साधण्यास सांगितले.
त्यांनतर विशेष शाखेकडून एका सीटची व्यवस्था करण्यात आली. आज संध्याकाळी सदर तरुणाला रेल्वेस्थानकाकडे रवाना करण्यात आले. सदर तरुणाकडे पैसे नसल्यामुळे पोलिस स्टेशनच्या गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याची वारजे ते पुणे रेल्वे स्थानक अशी रिक्षाने व्यवस्था केली.