वाघोली,(प्रतिनिधी)- ओएलएक्सवर गिफ्ट भेटलेली वॉशिंगमशीन विकण्याची जाहिरात दिलेल्या एका व्यक्तीची एक लाख 55 हजारांची फसवणूक झाली. एका व्यक्तीने सामान खरेदी करण्याच्या बहाण्याने क्यूआर कोड पाठवून त्याआधारे पैसे ट्रान्सफर करून घेतले. हा प्रकार वाघोली येथे घडला.
वाघोली येथील मोठ्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणार्या मॅनेजरने याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इलेक्ट्रॉनिक्स शोरूमकडून वॉशिंग मशीन भेट मिळाली होती.
ती वापरात नसल्याने विकण्याचे ठरवून त्याची जाहिरात त्यांनी ओएलएक्सवर टाकली. एकाने मशीन खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना संपर्क केला. त्यानंतर फिर्यादी यांना क्यूआर कोड पाठवून 5 रुपये पाठविण्यास सांगितले. पैसे पाठविल्यानंतर त्याच्या बँक खात्यावर 1 लाख 55 हजार काढून घेतले. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.