वडूज (प्रतिनिधी) खटाव तालुक्यातील एनकूळ या गावामध्ये सुरू असलेल्या दारूच्या अवैध विक्रीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांच्या आदेशाने कारवाई करण्यासाठी गेलेले वडूज पोलीस रिकाम्या हातानेच परत आल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यात सध्या अवैध धंद्यांना ऊत आला आहे त्यापैकीच एक असलेली अवैध दारूची विक्री सर्वसामान्यांच्या संसाराची राख रांगोळी करत आहे. एनकूळ (ता खटाव) या गावची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही.
याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वडूज पोलिसांना वारंवार कल्पना देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने एका स्थानिक नागरिकाने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत माहिती दिली. त्या माहितीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वडूज पोलिसांना सक्त कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
ग्रामस्थांनी कल्पना देऊनही कारवाई न करणारे वडूज पोलीस किमान जिल्हा पोलिसप्रमुखांनी आदेश दिल्यावर तरी कारवाई करतील अशी अपेक्षा होती परंतू ती फोल ठरली. केवळ कारवाईचा बनाव करत एनकूळ गावातून पोलीस गाडी फिरवत गावात आल्याचं दाखवून देण्यातच पोलिसांनी धन्यता मानल्याचे एका स्थानिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
पोलिसांनी गावातील दारू विक्रेत्याच्या घराची झडती घेतली परंतु ज्या ठिकाणी संबंधिताचा दारूचा साठा आहे तिथे छापा मारण्याकडे पोलिसांनी वेळेअभावी दुर्लक्ष केल्यानेच त्याठिकाणी असलेली दारू पोलिसांच्या हाताला लागली नाही.
यापेक्षा गंभीर असे, एनकूळ गावच्या चौकात उभा असलेल्या पोलीस गाडीच्या समोरूनच दारूचे बॉक्स भरलेली व्हॅन निघून गेल्याचे ग्रामस्थांनी पाहिले पण पोलिसांना हा प्रकार दिसला नसल्याने कारवाईसाठी मोठ्या जोशात गेलेल्या वडूज पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक अशोक पाटील म्हणाले, आम्ही कारवाईसाठी गेलो होतो पण काहीच सापडले नसल्याने परत आलो.