सोलापूर- जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आवसे वस्ती आमराई या झोपडपट्टी भागातील एका तरुणाने एका महिन्याच्या अंतराने चक्क दोन महत्त्वाच्या पदांना गवसणी घातली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि ज्युनिअर अभियंता अशी ही दोन महत्त्वाची पदे असून त्यापैकी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदाला त्याने पसंती दिली आहे. अभिजित अनिल नरळे ( वय 25,राहणार आवसे वस्ती आमराई,सोलापूर ) असे त्या युवकाचे नाव आहे.
अभिजित याचा जन्म 25 सप्टेंबर 1996 रोजी आवसे वस्ती या झोपडपट्टी भागात झाला आहे. वडील अनिल नरळे हे नरसिंग गिरजी मिलमध्ये काम करत होते. गिरणी बंद पडल्यानंतर त्यांनी सोलापूर बसस्थानकावर पाणी बाटली विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अभिजितसुद्धा त्यांना मदत करायचा. तर आई गृहिणी आहे. आईने बीएससीपर्यंत शिक्षण असूनही कपडे आणि बांगड्या विकून अभिजितसह सर्व मुलाबाळांना शिक्षित केले.
अभिजितला एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. अभिजितचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण आमराई येथील महात्मा बसवेश्वर प्रशालेत तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण नॉर्थकोट प्रशालेत झाले आहे. बीएमआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर त्याला तुळजापूर येथील जलसंपदा विभागात शासकीय सेवेत नोकरी लागली. पुढे रेल्वेच्या लोको पायलट पदासाठी नोकरी करायची म्हणून अभिजीतने जलसंपदा विभागातील नोकरीचा राजीनामा दिला. लोको पायलटसाठीच्या सर्व परीक्षेत पास झाला. मात्र चष्मा असल्याने यातून तो बाहेर पडला.
दरम्यान अभिजित याची चिकाटी कायम राहिली. वडिलांना व्यवसायात मदत करत आणि मिळेल त्या वेळेत अभ्यास करत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 15 मार्च 2020 रोजी पूर्वपरीक्षा दिली. तर 20 नोव्हेंबर 2021 रोजी पुण्यात मुख्य परीक्षा दिली. 22 मार्च 2022 रोजी या परीक्षेचा निकाल लागला.आणि अभिजित 300 पैकी 247 गुण मिळवून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून महाराष्ट्रातून 10 वा तर सोलापूर जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
इतकेच नव्हे तर अभिजितने लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असतानाच केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या मार्च 2020 मधील पूर्व परीक्षा व 26 सप्टेंबर 2020 रोजी मुख्य परीक्षा दिली होती. याचा निकालही 26 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झाला. आणि अभिजित हा ज्युनिअर इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाला. केवळ एक महिन्याच्या अंतराने अभिजित याने चक्क दोन महत्त्वाच्या पदांना गवसणी घातल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले अपार कष्ट आपल्याला यशस्वी करू शकले अशी प्रतिक्रिया अभिजित नरळे याने दिली. अभिजित याच्या यशाने परिसरातून आनंदाचे वातावरण पसरले आहे.