मातांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे वाटप
लोणी धामणी-जि. प. पुणे व पंचायत समिती आरोग्य विभागाच्याच्या वतीने लेक वाचवा, लेक शिकवा मोहिमे अंतर्गत जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचे स्वागत 2000 रुपयांचे वाटप करून करण्यात आले.
तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये जन्माला आलेल्या एकूण 44 मुलींच्या मातांच्या पोस्ट खात्यात जि. प. पुणे आरोग्य विभागाच्या वतीने 2000 रुपये रक्कम जमा करण्यात आली.
या योजनेमुळे मुलींचे जन्माचे प्रमाण वाढणार असून अशा योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवून त्याचा फायदा जनसामान्यांना झाला पाहिजे, असे मत पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी व्यक्त केले. या आरोग्य केंद्राने ही योजना यशस्वीपणे राबवत उल्लेखनीय काम केल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी तथा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम काळे, डॉ. रेश्मा बचुटे – शिंदे, आरोग्य सेविका, आशा कामगार इ. चा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सागर जाधव, उपसरपंच पुनम जाधव, माजी उपसरपंच वैशाली बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्या संगिता विधाटे, मिलिंद शेळके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन जाधव, गुलाब बोऱ्हाडे, बंटी जाधव, अमित भोर व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.