पुणे -महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी शिवसेनेची तयारी पूर्ण आहे. तर, महाविकास आघाडीत निवडणूक लढवल्यास शिवसेनेला 80 जागा पाहिजेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत शनिवारी पुण्यात स्पष्ट केले. तसेच मागील महापालिका निवडणुकीत भाजपने प्रभाग रचनेत राजकारण करून हस्तक्षेप केला. तर आता आमचे सरकार आहे.
त्यामुळे प्रभाग रचना, वॉर्ड रचनेत आम्हीही हस्तक्षेप नक्की करू, असेही ते म्हणाले.
खेड सभापती अविश्वास प्रकरणी पुणे दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी शनिवारी महापालिका पदाधिकारी, नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची धावती बैठक घेतली.
यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आदी यावेळी उपस्थित होते. राऊत म्हणाले, “आगामी निवडणुकांसाठी पक्षाकडून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात येत आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद येथे भगवा फडकवला असून, पुण्यातही आम्ही किंग नाहीतर किंगमेकर नक्की असू.’
…आमचीही लाट असेल
मागील निवडणुकीत भाजपचे संघटन नसतानाही ते पालिकेत सत्तेवर आले, ते केवळ लाटेमुळे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत आमचीही लाट असेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
कॉंग्रेसच्या भूमिकेचे स्वागत
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष स्वबळावर लढण्याचे सांगत असल्याचे विचारल्यानंतर, राऊत यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेचे स्वागत केले. कॉंग्रेस स्वबळावर लढली आणि त्यांची महापालिकेत सत्ता आली तरी आम्हाला आनंदच असेल. तर कॉंग्रेस बंगालमध्ये स्वबळावर लढली असून देशातही भाजपविरोधात कॉंग्रेस स्वबळावर लढून भाजपची सत्ता घालवल्यास शिवसेनेला सर्वाधिक आनंद होईल, असे राऊत म्हणाले.