नवी दिल्ली- गेल्या एका वर्षात शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या 700 शेतकऱ्यांची दखल न घेतल्याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा संसदेत विचारण्यात आले की सरकार मृत शेतकऱ्यांना आर्थिक भरपाईचा प्रस्ताव ठेवणार आहे का, तेव्हा सरकारने सांगितले की त्यांच्याकडे आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही. कृषी विभागाकडे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही, त्यामुळे कुटुंबांना आर्थिक मदतीचा प्रश्नच उद्भवत नाही. यावर राहुल गांधी म्हणाले की, जर सरकारकडे शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती नसेल तर आम्ही त्यांना संपूर्ण यादी देतो.
राहुल गांधी म्हणाले की सरकारकडे 403 लोकांची यादी आहे ज्यांना पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे आणि 152 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. सरकारकडे इतर राज्यांमधील 100 नावांची पण यादी आहे आणि तिसरी यादी आहे जी सार्वजनिक, ज्यातली नावं सहजपणे पडताळता येऊ शकतात. पण, आश्चर्य आहे की अशी कोणतीही यादी नसल्याचे सरकारच म्हणते.
आमच्याकडे 700 पैकी 500 शेतकऱ्यांची यादी आहे आणि उर्वरित नावे सार्वजनिक रेकॉर्डवर उपलब्ध आहेत, ज्याची सरकारने खात्री करावी. त्यानंतर मृत झालेल्या सर्व 700 शेतकरी कुटुंबांना आर्थिक भरपाई मिळावी, ही आमची मागणी आहे.
आपल्याकडून चूक झाली असे खुद्द पंतप्रधानांनी म्हटले आहे, त्यांनी देशाची माफी मागितली आहे. त्या चुकीमुळे आतापर्यंत 700 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण आता ते त्याच्या नावांबाबत खोटे बोलत आहेत, असा राहुल गांधींनी सरकारला टोला लगावला.