मुंबई – शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात होणाऱ्या गुप्त बैठका आम्हाला मान्य नाहीत. या बैठका आमच्यासाठी चिंतेची बाब आहे असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
शनिवारी पुण्यात अजित पवार व शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली होती, या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता पटोले यांनी वरील प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की तथापि, या विषयावर कॉंग्रेसचे प्रमुख नेते चर्चा करतील. इंडिया आघाडीच्या बैठकीत देखील यावर चर्चा होईल त्यामुळे मी यावर अधिक चर्चा करणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले.
पटोले म्हणाले, भाजपला विरोध करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे.
शरद पवार यांना सोबत न घेता लोकसभा निवडणूक लढवण्याचा कॉंग्रेसचा विचार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, बारामतीत बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षातील काही लोकांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, पण परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांची भूमिका बदलू शकते.
त्यांनी आपली भूमिका बदलली किंवा नाही, तरी आम्ही निवडलेल्या मार्गापासून दूर जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तथापि त्यांच्या या संदिग्ध भूमिकेविषयी शिवसेने पाठोपाठ आता कॉंग्रेस पक्षानेही स्पष्ट चिंता व्यक्त केल्याने पवार गटापुढे हा संभ्रम खात्रीशीरपणे कसा दूर करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.