गोपेश्वर – उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठ जवळील हेलांग येथे घर कोसळून दोन नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तुफानी पावसामुळे हे दुमजली घर कोसळले तेव्हा आत सात जण होते.
घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा बुधवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला. घराच्या ढिगाऱ्यातून पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
हे घर नदीच्या काठावर क्रशर युनिटजवळ बांधले गेले होते. अनमोल (19) आणि प्रिन्स (21) अशी मृतांची नावे आहेत, दोघेही नेपाळचे आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला जोशीमठमध्ये जमीन खचल्याने अनेक घरांचे नुकसान झाले असून पावसाळा सुरू झाल्यापासून ही समस्या अधिकच बिकट झाली आहे.