प्रदीप विधाते; शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे एक कोटी दहा लाखांचा निधी मंजूर
पुसेगाव – कटगुण येथील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे व तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे राष्ट्रीय पेयजल योजनेमधून एक कोटी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. नेर तलाव ते कटगुण या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून कटगुणच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी व्यक्त केले.
कटगुण (ता. खटाव) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सागरसाळुंखे, माजी उपसभापती संतोष साळुंखे, सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, माजी उपसरपंच उदय कदम, ग्रामपंचायत सदस्य विशाल देवकर, सागर जावळे, जयवंत फाळके, बाळासाहेब गायकवाड, सुषमा पाटोळे, पी. एस. गायकवाड, ग्रामसेवक उध्दव फडतरे, जितेंद्र गोरे, प्रकाश गोरे, बनसोडे, तानाजी गोसावी, बापू सुतार, मधुकर गायकवाड, संजय गायकवाड, जनार्दन गायकवाड, गणेश गायकवाड, भीमराव गायकवाड, गोरख वाघ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. विधाते म्हणाले, “”2009 पूर्वी या विभागातील अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित होते. परंतु, शशिकांत शिंदे या विभागाचे दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना गावे व वाड्यावस्त्यांवरील कमी-जास्त मतांचा विचार न करता केवळ जनहिताच्या विकासकामांना प्राधान्य देऊन कोट्यवधी रुपयांची विकास कामे त्यांनी प्रत्यक्षात मार्गी लावली. यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर विकास कामांबाबत समाधानाची लखेर दिसून येते.
कटगुणमध्ये लोकचळवळीच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनमध्ये माथा ते पायथा या संकल्पनेनुसार पाणी अडविण्याचे काम चांगले झाले आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कटगूणला विकासकामात झुकते माप देण्याचे काम निश्चितपणे केला जाईल.’ कटगूण येथे दरवर्षीची पाणी टंचाई लक्षात घेऊन शशिकांत शिंदे, संजीवराजे, प्रदीप विधाते यांच्या प्रयत्नांतून निधी मंजूर झाला.
या योजनेमध्ये नेर तलाव ते कटगूण मेन पाइपलाइन, फिल्टर, अंतर्गत वितरण व्यवस्था यासह विविध कामांचा समावेश आहे, अशी माहिती संतोष साळुंखे यांनी दिली. त्याचबरोबर सिमेंट बंधारे, बंधारे दुरुस्ती, कटगुण- खटाव रस्ता डांबरीकरण, महात्मा फुले स्मारक सुशोभीकरण, आरोग्य, शिक्षण, स्मशानभूमी सुशोभीकरण यासह विविध विकासकामे प्रत्यक्षात मार्गी लावलेली आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कटगुण ग्रामस्थांच्यावतीने प्रदीप विधाते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी उपसरपंच उदय कदम, सूत्रसंचलन उपसरपंच जयदीप गायकवाड यांनी केले. प्रा. गायकवाड यांनी आभार मानले.