पुणे – पुणे महापालिका हद्दीतील श्वानांना पकडणे आता सोपे बनणार आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पुणेकरांसाठी डोकेदुखीची ठरत असतानाच त्यांच्या बंदोबस्ताकरिता पालिकेच्या ताफ्यात तब्बल 12 गाड्या दाखल होणार आहेत.
सद्यःस्थितीत पालिकेच्या मालकीच्या 5 गाड्या असून एका एनजीओने 5 गाड्या दिल्या आहेत. नव्याने ताफ्यात दाखल होणाऱ्या 12 गाड्यांमुळे श्वान पथकातील गाड्यांची संख्या आता 22 वर जाणार आहे.
दरम्यान, पुण्यात 15 क्षेत्रीय कार्यालये आहे. प्रत्येक कार्यालयाकरिता एक स्वतंत्र गाडी राखीव असणार आहे. त्या-त्या परिसरातील कुत्री पकडून त्यांच्या नसबंदीकरिता जलदगतीने त्यांचा वापर होणार आहे.
नगरमधील एका संस्थेशी बोलणे झाले असून त्यांना वर्क ऑर्डरही दिली आहे. मात्र, अद्याप त्यांच्याशी करार झाला नसून येत्या काही दिवसांत तो होईल. या संस्थेच्या लोकांना चर्चेकरिता मंगळवारी (दि. 13) पुण्यात बोलावले होते, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. हा करार झाल्यास 20 ऑक्टोबरपर्यंत गाड्या ताफ्यात दाखल होतील.
डॉ. प्रकाश वाघ, पशुवैद्यकीय अधीक्षक, महापालिका