विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांची माहिती
पुणे – करोनाबाधितांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रयत्न सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून रुग्णालयाला उद्योजक अविनाश भोसले यांनी प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट दिली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव “आयसीएमआर’कडे पाठविण्यात आला असून, परवानगी प्राप्त झाल्यावर उपचार सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. या मशिनद्वारे प्लाझ्मा वेगळा काढला जाऊ शकतो आणि हा प्लाझ्मा करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरला जाऊ शकतो. असा प्लाझ्मा 18 वर्षावरील पुरुष किंवा महिला व्यक्ती देऊ शकते. तथापी संबंधित महिला अद्यापपर्यंत गर्भवती राहिलेली नसावी. तसेच त्या व्यक्तीचे वजन 55 किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीच्या करोनाच्या शेवटच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्ती करोनाच्या रुग्णाला प्लाझ्मा देऊ शकतात.
प्लाझ्मा डोनेट करण्यापूर्वी मागील 28 दिवसात या व्यक्तीमध्ये कोविड-19 ची कोणतीही लक्षणे आढळलेली नसावीत. संबंधित व्यक्ती हिपॅटाइटिस-बी तसेच एचआयव्ही बाधित नसणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रक्तदान करताना तपासणी करण्यात येणारा रक्तगट व आवश्यक बाबींची काळजीदेखील घेण्यात येईल, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.