वाघोली – माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिरूर हवेली मतदार संघाचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व हवेलीत तालुक्यात भव्य नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मोफत जॉब कार्ड अर्थात नोकरी मार्गदर्शकाच्या वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे पूर्व हवेलीत असणाऱ्या लोणीकंद – पेरणे व वाडे बोल्हाई – कोरेगाव मूळ, या दोन्ही जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या गावांतील युवक युवतींसाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद यांनी दिली आहे.
कंद यांनी सांगितले की दोन वर्षांच्या कोरोना काळात, लॉकडाऊन मुळे अनेक लोक बेरोजगार झाले. अगदी उपासमारीची वेळ बर्याच कुटुंबांवर आली. शिवाय सुशिक्षित बेकारही अतिशय त्रासलेले आहेत. अपमानाचं जिणं ते जगतायत. या दाहक पार्श्वभूमीवर हा भव्य नोकरी मेळावा, गरजूंना खूप सहाय्यभूत ठरेल परिसरातील 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग या मेळाव्यामध्ये राहणार आहे.
मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी अंतिम दिनांक 22 ऑगस्ट असून नाव नोंदणी नंतर पुढील मेळाव्याची कार्यवाही होणार असल्याचे कंद यांनी सांगितले.