नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्रीधरन श्रीराम याच्याशी बांगलादेश क्रिकेट मंडळाने करार केला आहे. या करारानूसार यंदाच्या मोसमापासून तो बांगलादेशच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे.
गेल्या दोन मोसमांत बांगलादेश संघाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्यातच त्यांना वेस्ट इंडीज व झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकांमध्ये पराभव स्वीकारावे लागले होते. संघाला या अपयशी कामगिरीतून बाहेर काढून विजयाच्या मार्गावर श्रीराम निश्चितच घेऊन जाइल, असा विश्वास बांगलादेश क्रिकेट मंडळाने केला असून नव्या संघासाठी काम करण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे, असे श्रीधरन श्रीरामने म्हटले आहे.
दरम्यान, श्रीराम यांनी 2000 ते 2004 दरम्यान भारतासाठी आठ वनडे सामने खेळले होते. श्रीराम ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक आणि स्पिन गोलंदाजी कोच होते. ऑस्ट्रेलियाचे माजी कोच डॅरन लीमन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम यांना 2016 साली ऑस्ट्रेलियन स्पिन गोलंदाजी कोचची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
त्यांनी मागच्याच महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2010 आणि 2011 साली श्रीराम रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा भाग होते. 2019 साली आरसीबीसाठी बॅटिंग आणि स्पिन गोलंदाजी कोच म्हणून त्यांनी काम केलं होतं.