वाघोली – अनेक वर्षापासून वाघोली मध्ये ग्राम सचिवालयाची प्रशस्त इमारत व्हावी व या प्रशस्त इमारतीमधील गाळे स्थानिक बेरोजगार युवकांना लिलाव पद्धतीने देऊन त्यांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे तत्कालीन पदाधिकारी यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता. या पाठपुराव्याला ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे व त्यांच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यकाळात यश आले आहे. मात्र वाघोली गावचा पुणे महानगरपालिकेत समावेश होत असल्याने ग्राम सचिवालय साठीची पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाकडून परवानगी मिळून देखील ग्राम सचिवालय होणार नाही. त्यामुळे वाघोली मधील तालुका हवेली येथे गट नंबर 1119 व 1123 मध्ये 13700 चौरस मीटर क्षेत्रावर वाघोली ग्रामपंचायत प्रकल्पामधील वाणिज्य इमारतीच्या सुधारित बांधकाम प्रस्ताव मंजुरी साठी पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण पुणे यांच्याकडून दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विकास परवानगी व प्रारंभी प्रमाणपत्र वाघोली ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत यांना देऊन देखील केवळ पुणे मनपाच्या प्रवेशामुळे ग्रामसचिवालय चे स्वप्न पूर्ण होणार नाही. मात्र ग्रामपंचायतीच्या सध्याच्या पदाधिकारी वर्गाने पुणे मनपात समावेश झाल्यानंतर याच जागी प्रशासकीय इमारत करण्याचा निर्धार केला आहे.
वाघोली नवे उपनगर …
वाघोली ची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या वाढत्या लोकसंख्येच्या समस्या दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. अंतर्गत रस्ते, पथदिवे, पिण्याची पाण्याची उपलब्धता याबाबत ग्रामपंचायतीने कोट्यावधी रुपयांचा खर्च करून कामे केली आहेत ही कामे वाघोली एक विकसित उपनगराच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. पुणे महानगर पालिकेत प्रवेश होण्याअगोदर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विकासकामांचे आज नागरिक कौतुक करत आहेत.
एकाच इमारतीत वेगवेगळ्या विभाग कार्यरत राहण्याची गरज …
सध्या वाघोली मध्ये महावितरण कार्यालय, पोस्ट ऑफिस, पीएमआरडीए कार्यालय, सिटी सर्वे कार्यालय, पोलीस चौकी आहेत. वाघोली मध्ये वेगवेगळ्या विभागांची कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असून ही सगळी कार्यालय एका प्रशासकीय इमारतीत होऊ शकतात यासाठी वाघोलीत प्रशासकीय इमारत लवकरात लवकर होण्याची गरज आहे.
वाघोली मधील ग्रामसचिवालय लवकरात लवकर उभे करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ग्रामसचिवालय बांधण्यास विलंब झाला. या ग्रामसचिवालयात वाघोली मधील स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या परवानगीने लिलाव पद्धतीने गाळे भाडे तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव होता. त्यातून स्थानिक युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार होती. हेच स्वप्न आगामी काळात पुणे मनपात प्रवेश झाल्यानंतर वाघोली मध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्रशासनाच्या मान्यतेने रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे गाळे भाडेतत्त्वावर वाटप करण्याचा प्रयत्न राहील. याशिवाय वेगवेगळ्या विभागांमार्फत नागरिकांना तातडीने मदत होईल अशा प्रशासकीय इमारती च्या उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
संदीप सातव
माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली वाघोली मध्ये प्रशासकीय इमारत लवकरात लवकर बनवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
बाळासाहेब सातव पाटील (गवळी)
वरिष्ठ उपाध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी