अधिसूचना जारी ः नवीन गावास मान्यता
महाळुंगे इंगळे-चाकण उद्योगपंढरीतील चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खराबवाडीतील ‘वाघजाईनगरला’ (ता. खेड) अखेर स्वतंत्र गावाची मान्यता मिळाली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतची तशी प्राथमिक अधिसूचना काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आली होती. आता पुन्हा तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून नव्याने आदेश देण्यात आले आहेत. नव्याने अस्तित्वात येणाऱ्या वाघजाईनगर या गावाला स्वतंत्र गावाची मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
नवीन वर्षापासून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खराबवाडी गावची वाघजाईनगर सोबतच्या अनुसूचिमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाघजाईनगर या स्वतंत्र नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नवीन गावातील लोकांना मूळ गावच्या गायरान स्मशानभूमी, फोरेस्ट आदि राखून ठेवलेल्या जमिनीचा वापर करण्याचा सर्वाधिकार देण्यात आला आहे. वाघजाईनगरला स्वतंत्र गाव म्हणून घोषित करण्यात यावे, यासाठी वाघजाईनगर ग्रामस्थांच्या वतीने खराबवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व युवा उद्योजक राहुल शेलार यांनी शासन दरबारी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून, वाघजाईनगर हे स्वतंत्र महसुली गाव करणे कामी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे त्यांनी वारंवार मागणी केली होती.
त्यासाठी शेलार यांना खराबवाडीच्या विद्यमान सरपंच काजल शेडगे, माजी उपसरपंच रोहिदास शिळवणे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम शिळवणे, उद्योजक दत्तात्रय शिळवणे, माजी उपसरपंच बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर शिळवणे, शिवसेनेचे खेड तालुका उपप्रमुख संतोष शिळवणे, मारुती शिळवणे, लक्ष्मण शेडगे, रोहीदास चव्हाण, संजय चव्हाण, प्रकाश चव्हाण, दत्ता शिळवणे, भगवान गायकवाड, शशिकांत शेडगे, सुभाष कांबळे, दत्ता साठे, ज्ञानेश्वर साठे, नरेंद्र भोसले, शशिकांत सावळे, पोपट शिळवणे, सचिन मेणे, पांडुरंग शिळवणे, काशिनाथ चव्हाण, काळुराम शिळवणे, शंकर गुजर. शंकर घाडगे, माधव गायकवाड, रमेश शितोळे, रुपेश वर्पे, अनिल चव्हाण, भरत बोडके, बाळासाहेब भांगरे, शिवाजी शिळवणे, नवनाथ मापारी येथील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे वाघजाईनगरला स्वतंत्र गावाची मान्यता मिळाली आहे.
खेडचे आमदार दिलीप मोहिते तसेच माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे व खेड तालुक्याचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्या शिफारशी नुसार आणि खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या विशेष सहकार्यातून वाघजाईनगरला महसूल गाव म्हणून मान्यता मिळाली आहे. अशी माहिती राहुल शेलार यांनी दिली. वाढते औद्योगिकीकरण, विस्तारते नागरीकरण याचा सारासार विचार करता चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडीतील वाघजाईनगर हे छोटेखाणी गाव म्हणून नव्याने स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार असल्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
- खराबवाडीतील वाघजाईनगरला नव्याने स्वतंत्र ग्रामपंचायत होणार असल्याने खराबवाडी ग्रामपंचायतीवरील विविध कामांचा ताण, नागरिकांना त्याठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यांची बचत बचत होणार आहे. त्यामुळे वाघजाईनगर येथे स्वतंत्र गावाची निर्मिती होणे हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होते.
-काजल शेडगे, सरपंच खराबवाडी - खराबवाडी बरोबरच वाघजाईनगर परिसरातही छोट्या – मोठ्या कंपन्या, कारखाने, वर्कशॉप आहेत. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कामगार व भाडेकरुंची संख्याही त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. वाघजाईनगर परिसरात दिवसेंदिवस नागरिक व भाडेकरू यांची संख्या वाढू लागल्याने येथे पायाभूत व मुलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. त्या सुविधा आता तातडीने मार्गी लावण्यास मदत होणार आहे.
-राहुल शेलार, युवा उद्योजक वाघजाईनगर