एटीएमवर दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड

आळेफाटा पोलिसांची कारवाई ः रात्री गस्त घालताना पकडले चोर

आळेफाटा-येथे गुरूवारी (दि. 5) मध्यरात्रीच्या सुमारास बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांच्या टोळक्‍याला पकडण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा दरोड्याचा प्रयत्न फसला.

निकेतन गोकुळ साळवे (वय 22, रा. नाशिक), सागर अनिल दैवज्ञ (वय 25, रा. पारनेर, अहमदनगर), राहुल भगवान साळवे (वय 24, रा. नाशिक) व अरुण ज्ञानेश्वर भांगरे (वय 24, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, उपनिरीक्षक एस. ए. डौले, पोलीस नाईक महेश पठारे, नीलकंठ कारखिले, निखील मुरुमकर, कर्मचारी गर्जे व वैद्य हे गुरूवारी मध्यरात्रीच्या दरम्यान आळेफाटा या ठिकाणी रात्रगस्त व नाकाबंदी करत असताना पोलीस निरीक्षक मुजावर यांना बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम समोर दोघेजण संशयीतरित्या थांबलेले आढळले. ते एटीएम फोडण्याची रेकी करत असल्याचा संशय आल्याने मुजावर यांनी त्यांना हटकले असता त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्विफ्ट मोटारीमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

आळेफाटा पोलिसांनी या कारचा पाठलाग करुन या कारमधील चारजणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील मारुती स्विफ्ट डिझायर कारची (एमएच 04 जीई 7816) झडती घेतली असता, त्यामध्ये ऑक्‍सिजन सिलेंडर बाटला, एक गॅस सिलेंडर टाकी, एक निळ्या व एक गुलाबी रंगाच्या दोन गॅसच्या नळ्या त्यांना रेग्यूलेटर बसविलेले एक गॅस कटर, दोन स्पॅनर, दोरी, दोन बांबू, तीन मिरची पावडरच्या पुड्या, मास्क, कानटोपी, तीन मोबाईल मिळाले. या मुद्देमालासह स्विफ मोटार असा एकूण साडेसहालाख रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. या चार जणांनी गॅस कटरने एटीएम कट करून पळून घेऊन जाण्याचा बेत असल्याची कबुली दिली आहे. आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत आहेत.

  • पोलीस पथकाला 35 हजारांचे बक्षीस
    आळेफाटा पोलिसांनी प्रभावीपणे रात्र गस्त व नाकाबंदी करत एटीएमवर दरोडा टाकणाऱ्या टोळक्‍यावर कारवाई केल्याबद्दल या पोलीस पथकास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 35 हजार रुपयांचे रोख रकमेचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे टी. वाय. मुजावर यांनी सांगीतले
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)