महाबळेश्वर – येस बॅंक आर्थिक घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेले उद्योगपती धीरज व कपिल वाधवान यांना सीबीआयच्या पथकाने महाबळेश्वर येथील “वाधवान हाऊस’ या बंगल्यातून रविवारी अटक केली. सीबीआयने अचानक केलेल्या कारवाईमुळे होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या वाधवान कुटंबाला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, वाधवान बंधूंना उद्या, दि. 27 रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काल पासुनच या परीसरातील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती.
जिल्हा बंदी आदेश झुगारून पुणे जिल्ह्यातून महाबळेश्वरला आलेल्या वाधवान कुुटुंबीयांवर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल करून त्यांना पाचगणीत इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन केले होते. त्यानंतर सीबीआयचे अधिकारी धीरज व कपिल वाधवान यांना ताब्यात घेण्यासाठी पाचगणीत आले होते; परंतु जिल्हा प्रशासनाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाइन कक्षात प्रवेश नाकरला होता. त्यामुळे क्वारंटाइनचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत थांबण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता. येस बॅंक घोटाळ्यात सीबीआयकडून अटक होण्याची खात्री असल्याने वाधवान बंधूंनी वकिलांमार्फत न्यायालयात धाव घेऊन अटकेला स्थगिती मिळविली होती. वाधवान बंधूंना 5 मेपर्यंत अटक करण्यास न्यायालयाने सीबीआयला मनाई केल्याचे समजते.
न्यायालयाच्या या निर्णयावर सीबीआयने अपील केले. देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यात वाधवान बंधू मुख्य संशयित आहेत. त्यांचा इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनचा कालावधी संपुष्टात आला आहे. ते महाबळेश्वर येथे ज्या बंगल्यात वास्तव्यास आहेत, तो बंगला घनदाट जंगलात आहे. बंगल्याचा परिसरही मोठा असल्याने वाधवान यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, हे मोठे दिव्य आहे, ही बाब सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सीबीआयचे म्हणणे ग्राह्य धरून 5 मेपर्यंत अटकेला दिलेला स्थगिती आदेश न्यायालयाने काल (दि. 25) मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. न्यायालयाच्या या आदेशाची माहिती सीबीआयने सातारा पोलिसांना कळविली. त्यानंतर काल सायंकाळी महाबळेश्वर पोलिसांनी शहराची नाकाबंदी करून प्रत्येक नाक्यावर बंदोबस्त वाढविला. वाधवान हाऊस भोवतीच्या बंदोबस्तातही मोठी वाढ केली. हा बंगला घनदाट जंगलात असल्याने सातारा येथील शीघ्र कृती दलाने परिराचा ताबा घेऊन जंगलात पहारा ठेवला.
पोलिसांची वर्दळ वाढल्याने वाधवान बंधूंना अटक होणार, अशी चर्चा रात्रीपासूनच महाबळेश्वरात सुरू झाली सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक आज सकाळी मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. या अधिकाऱ्यांसोबत वाईचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके, महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी व पोलीस पथकाने वाधवान हाऊस येथे जाऊन वाधवान बंधूंना न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता वाधवान बंधूंना पोलीस ठाण्यात नेऊन कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात आल्यावर सव्वातीन वाजता वाधवान बंधूंना घेऊन सीबीआयचे पथक मुंबईकडे रवाना झाले. सीबीआयच्या पथकासोबत पोलिसांच्या गाड्याही होत्या.
बंदोबस्ताचा ताण
हायप्रोफाइल संशयित आरोपी असलेल्या वाधवान बंधूंच्या बंदोबस्ताचा ताण गेले अनेक दिवस स्थानिक गुन्हे शाखा व महाबळेश्वर पोलिसांवर होता. त्यामुळे वाधवान बंधूंना ताब्यात घेऊन सीबीआयचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.