वाघळवाडी -वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाने त्वरित वडगाव निंबाळकर गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
पेशी कमी झाल्याने हवापालट करण्यासाठी मुंबईहून वडगाव निंबाळकर येथील जगताप वस्तीवर आपल्या मुलीला भेटण्यासाठी एक महिला शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी मुंबईहून आली होती. दरम्यान, तिला यापूर्वीच ताप येत होता. घशातही खवखव होत होती. वडगावला त्या आल्या होत्या.
मात्र, येथेही त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्याला नेण्यात आले. ससूनमध्ये त्यांची तपासणी केली असता, त्या करोना पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी (दि. 18) रात्री समोर आले. त्यामुळे अवघ्या एका दिवसाच्या मुक्कामात किती जणांना करोनाचा संसर्ग झाला, याची माहिती काढण्यात स्थानिक प्रशासनाची धांदल उडाली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. वडगाव निंबाळकर येथील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लॉकडाउनदरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये. गेली दोन महिने करोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठ दिवसांत काही दुकाने सुरू ठेवण्यास ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती.
मात्र, करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आता पूर्ण गाव पुन्हा बंद करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबातील व्यक्तिंना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.