संगमनेर -संगमनेर तालुक्याच्या बाजार समितीची निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही निवडणूक आजी-माजी महसूलमंत्री यांच्यात थेट होती. 18 जागांसाठी 45 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत चार वाजता बंद झाले आहे. पावणे चारच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्याने मतदार व निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. उद्या मतमोजणी होणार आहे.
बाजार समितीच्या मतदानासाठी सकाळपासून मतदारांची रीघ पाहायला मिळाली. काही उत्साही मतदार फेटे घालून मतदानाला येताना दिसले. तर फेटे घालून मतदानाला का आलात अशी विचारणा केली असता, नेत्याला खंबीर साथ आहे असे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील बाजार समितीसाठी जनसेवा पॅनल उभा केला असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान महसूलमंत्री विखे आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अनेक सभा घेतल्या. या सभेमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाडल्या गेल्या.
शुक्रवारी बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया सकाळपासूनच सुरू झाली. त्यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या माजीमंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले की, राज्यभर आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोतच, परंतु बाजार समितीच्या निवडणुका या पक्ष पातळीवर होत नसतात. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अनेक ठिकाणी निवडणुका लढवत आहोत आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. राजकारण आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते करावे लागते आणि बऱ्याच काळानंतर निवडणुका होत आहे आणि पुढे निवडणुकांचा काळ आहे.
त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकांना महत्त्व आलेले आहे. प्रत्येकाचा मतदार संघ असतो. थोड अटीतटीची लढाई होतच असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर 18 जागांसाठी 45 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असून शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपले मत टाकणार आणि दोन दिग्गज नेत्यांमध्ये कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
निवडणुकीत 97 टक्के मतदान
मतदान 3 हजार 614 होते तर यापैकी 3 हजार 505 मतदान झाले असून जवळपास 97 टक्के मतदान झाले. सोसायटीत 1 हजार 677 पैकी 1 हजार 621, ग्रामपंचायत 1 हजार 387 पैकी 1367, हमाल- मापाडी 147 पैकी 143 तर व्यापारी 403 पैकी 370 मतदान झाले.