पुणे – सामाजिक कार्यकर्ते शिव ऋण युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय मोहन बोऱ्हाडे (वय 27, रा. शिरोली बु, ता. जुन्नर) यांना जीवे ठार मारणे प्रयत्न प्रकरणात दिलासा मिळाला आहे. खेड येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एन.राजुरकर यांनी जामीन मंजुर केला आहे.
त्यांनी ऍड. गणेश माने यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात त्याच्यासह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. 24 सप्टेंबर 2022 रोजी जुन्नर येथे ही घटना घडली. याबाबत 40 वर्षीय व्यक्तीने जुन्नर पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी त्यांच्या वडापाव सेंटर येथे होते. तेथे बोऱ्हाडेसह 7 ते 8 जण गेले. त्यांनी फिर्यादीला “तुझा भाऊ कोठे आहे.
पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यास सांग’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मानेवर चाकून वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींचा गुन्हा करण्यामागे काय हेतू होता, हे आरोपपत्रावरून सिध्द होत नाही.
सदरचा गुन्हा राजकीय द्वेषातून दाखल केलेला असून, दोषारोपपत्रातील पुराव्यावरून या घडीला हा गुन्हा आरोपीने केल्याचे सिध्द होत नाही. गुणदोषावर खटल्याचे कामकाज चालल्यास, सदरचा गुन्हा आरोपींना केला आहे किंवा नाही, हे सिध्द होण्यास बराच कालावधी जाणार आहे.
तोपर्यंत आरोपीला कारागृहात बंदीस्त ठेवणे न्यायाच्या दृष्टीने उचत नाही, असा युक्तीवाद ऍड. माने यांनी केला. त्यांना ऍड. उमेश मांजरे, ऍड. धनंजय गलांडे आणि ऍड. रुक्सार मुल्ला यांनी सहकार्य केले.