पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कृषी घटकांचा मोठा उत्साह दिसला. 18 जागांसाठी 72.29 टक्के मतदान झाले. आज महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात मतमोजणी होणार आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या मुद्यावरून वाद, तणाव आणि गोंधळ पाहण्यास मिळाला. प्रत्येक वेळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कोणतीही प्रत्यक्ष तक्रार आलेली नाही.
मतदानाला सुरूवात होताच शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा विद्यालयावरील केंद्रावर मतदारांनी गर्दी केली. एका गटाच्या उमेदवारांना अनेक लोकांचे खोटे आधार कार्ड दाखवून मतदान करून घेतल्याचा आरोप झाला, त्यामुळे मतदान थांबविण्यात आले. त्यामुळे गोंधळ वाढला होता. तसेच, तणावही निर्माण झाला होता. या केंद्रात आडते, व व्यापारी गटाचे मतदान पार पडले.
ग्रामपंचायत आणि सेवा सहकारी संस्था गटासाठीच्या मतदान केंद्रावरही उमेदवार मतदारांची बस घेवून मतदान केंद्रावर येत असल्याचा आरोप झाल्याने दोन गटात शाब्दिक खटके उडाले. पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद थांबविला. सेवा सहकारी संस्था गटातील 11 जागा, ग्रामपंचायत गटात 4, व्यापारी व आडते गटात 2 आणि हमाल, मापाडी गटातील 1 जागेसाठी मतदान पार पडले.
या निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल व सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी असे दोन पॅनल एकमेकांविरुद्ध उभे आहेत. व्यापारी गटातील पॅनेलने कोणालाही पाठींबा दिलेला नाही. व्यापारी गटात दोन दोन उमेदवारांचे पॅनेल आहेत. सर्वाधिक चुरस या गटात पाहायला मिळत आहे.
पोलिसांची दमछाक…
हमाल, तोलणार, सहकारी सेवा संस्था आणि ग्रामपंचायत गटापेक्षा आडते व व्यापारी गटासाठी झालेल्या मतदान केंद्रावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून सकाळपासून तणाव पाहण्यास मिळाला. त्यामुळे या केंद्रावर पोलिसांची दमछाक झाली. विशेष म्हणजे थोड्या थोड्या वेळाने जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना अक्षरश: कसरत करावी लागत होती. शिवाजी मराठा हायस्कूल केंद्रावर मतदान संपेपर्यंत उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू होते.