पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदार संघातंर्गत विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी “स्वीप’ कक्षातर्फे बुधवारी चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स ऍन्ड कॉम्प्युटर स्टडीज व प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मतदान करण्याबाबत व इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याविषयी मार्गदर्शन करून शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी डॉ. दीपक शाह, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य डॉ.वनिता कुऱ्हाडे, कार्यक्रम अधिकारी अरविंद बोरणे, डॉ.आनंद लुकंड, पांडुरंग इंगळे आदी उपस्थित होते. पिंपरी विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हावे, या दृष्टीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावे, असे मत पिंपरी विधानसभेचे मतदार नोंदणी अधिकारी सुनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.
सर्वांनी जोमाने काम करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन स्वीप कक्षप्रमुख मुकेश कोळप यांनी केले. तानाजी सावंत, सुशांत जोशी आदी उपस्थित होते.