पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मनमोहन सिंग यांचे परदेश दौरे जास्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून सरकारला घेरणाऱ्या कॉंग्रेसला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त परदेश दौरे केला असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे हजारो लोक विमानतळाबाहेर जमा होतात आणि मोदींच्या नावे घोषणाबाजी करतात. यामुळे कॉंग्रेसच्या पोटात दुखत आहे. त्यामुळेच मोदी खूप परदेश दौरे करतात असा आरोप कॉंग्रेस करत असते, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

यावेळी अमित शाह यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेतील ह्युस्टन येथे पार पडलेल्या नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रसिद्ध पंतप्रधान असल्याचे सिद्ध होत आहे असे सांगितले. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यातील फरक सांगताना अमित शाह यांनी टीका करत म्हटलं की, मनमोहन सिंग कागदावर जे लिहिलं आहे, जे मॅडम लिहून द्यायच्या तेच वाचायचे. मनमोहन सिंग यांनी मलेशियात रशियासाठी लिहिलेले भाषण वाचले होते.

27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानतळावरील फोटोंचा कोलाज करत पोस्ट केला होता. या फोटोतून त्यांनी जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देत मोदींना टोला लगावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे हा नेहमीच विरोधकांचा टीकेचा विषय राहिला आहे. भाजपाने मात्र नेहमी मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे भारताचं जागतिक स्थान उंचावत असून अनेक परदेशी गुंतवणूक भारतात होत असल्याचा दावा केला आहे. डिसेंबर महिन्यात केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी संसदेत माहिती देताना सांगितलं होतं की, नरेंद्र मोदींनी मे 2014 रोजी पंतप्रधानपद हाती घेतल्यापासून 48 परदेश दौरे केले असून 55 देशांना भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.