2 हजार 319 नवीन मतदार वाढले ; 2 मतदान केंद्रामध्ये वाढ; एकूण 35 मतदान केंद्र
वाघोली- शिरूर- हवेली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.21) रोजी होणाऱ्या मतदानामध्ये वाघोलीतील 37 हजार 643 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 35 हजार 324 मतदार होते. ऑनलाईन, मतदार नोंदणी अभियानात 2 हजार 319 नवीन मतदार वाघोलीच्या मतदारयादीत जोडले आहेत. त्याचबरोबर दोन मतदान केंद्रामध्ये वाढ झाली असून एकूण 35 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
शिरूर- हवेली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या वाघोली गावामध्ये 37 हजार 643 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्यामुळे निवडणुकीतील टर्निंग पॉइंट वाघोली ठरणार आहे. ऑनलाईन, मतदार नोंदणी अभियानात दोन वर्षांमध्ये 13 हजार 178 नवीन मतदार वाढले आहेत. वाघोलीत सोमवारी (दि.21) होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून जवळपास 250 कर्मचारी यासाठी कार्यरत राहणार आहेत.
वि. शे. सातव हायस्कूलमध्ये 15 मतदान केंद्र आहेत. 240 ते 248 क्रमांकाच्या केंद्रामध्ये नाव असणाऱ्या मतदारांना याठिकाणी मतदान करता येईल. जिल्हा परिषद शाळेमध्ये 20 मतदान केंद्र असून 249 ते 263 क्रमांकाच्या केंद्रामध्ये नाव असणाऱ्या मतदारांना याठिकाणी मतदान करता येईल. दिव्यांग मतदारांसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दोन्ही ठिकाणी रॅम्प बनविण्यात आले आहेत. दिव्यांगांना मदत करण्यासाठी निवडणूक यंत्रणा काम करेल. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मतदानादिवशी वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशनचे स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीसाठी काम करणार आहेत. मतदारांना त्यांचे नाव शोधून देण्यासाठी व इतर मदतीसाठी मदत केंद्र उभारले जाणार आहे. तरुण व सर्व मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉइंट उभारला जाणार आहे. पाण्याचे वाटप करण्याचा विचार आहे.
शिरूर विधानसभेत सर्वाधिक मतदार संख्या असणारे गाव/शहर
गावाचे/शहर पुरुष महिला तृतीयपंथी एकूण मतदार
वाघोली 20336 17304 3 37643
शिरूर शहर 14783 14455 — 29238
उरुळीकांचन 11953 10667 — 22620
लोणीकाळभोर 9933 8984 — 18917
कदमवाकवस्ती 8745 7976 1 16722
तळेगाव ढमढेरे 6547 6053 — 12600
शिक्रापूर 6065 5744 3 11812