पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 17 ते 25 जूनपर्यंत मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. तर 7 जुलैला अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी गुरुवार (दि. 2) रोजी काढला आहे.
हा आदेश महापालिका आयुक्तांना शुक्रवारी प्राप्त झाला आहे. 5 जानेवारी 2022 ते 31 मे 2022 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेल्या, वगळलेल्या अथवा दुरुस्त झालेले मतदार विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम करावे लागणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ज्या ठिकाणी पाऊस कमी तेथे निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्यातील महापालिका निवडणूक प्रक्रिया सध्या:स्थितीत वेगाने सुरू आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. आता आयोगाने मतदार याद्यांचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे.
महाऑनलाइन माध्यमातून मतदार यादी महापालिकेच्या निवडणूक विभागाने विधानसभेच्या मतदार याद्यांचे विभाजन राज्य निवडणूक आयोगाने महाऑनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रणालीमार्फत करावे. विधानसभा मतदार यादीत महापालिकांच्या संबंधित प्रभागाच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान आहे, याची खातरजमा करावी. मतदार यादीतील दुबार नावे वगळावीत. नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे, नावातील दुरुस्ती व पत्त्यामधील दुरुस्ती करणे इत्यादीबाबतची कार्यवाही आयोगाकडून केली जात नाही. महाऑनलाइनतर्फे तयार केलेल्या आज्ञावलीच्या मदतीने प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन करावे, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत.
================