- करोनामुळे निवडणूक लांबणीवर
- चिखलीत चार वर्षात मतदारसंख्या झाली दुप्पट
पिंपरी – करोनामुळे शहरातील तीन नगरसेवकांचे निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी महापालिकेने अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार चार वर्षांत चिखलीमध्ये (प्रभाग क्रमांक एक) मतदारसंख्या दुप्पट झाली आहे.
चिखलीमध्ये मतदारसंख्या 66 हजार 142 झाली आहे. दिघी – बोपखेल (प्रभाग क्रमांक 4) मध्ये 42 हजार 433 आणि काळभोरनगर – आकुर्डी या (प्रभाग क्रमांक 14) मध्ये 50 हजार 289 जण पोटनिवडणुकीसाठी मतदान करू शकणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारी 21 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 1 चिखलीमधून निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे 4 जुलै 2020 रोजी निधन झाले. तर, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर – आकुर्डी प्रभागातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे करोनामुळे 31 जुलै 2020 रोजी आणि प्रभाग क्रमांक चार दिघी – बोपखेलमधून निवडून आलेले भाजपचे लक्ष्मण उंडे यांचे 26 सप्टेंबर 2020 रोजी करोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने पोटनिवडणुकीसाठीची मतदार यादी तयार केली असून, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये महिला 29 हजार 504, पुरुष 36 हजार 634 आणि इतर 4 असे एकूण 66 हजार 142 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत मतदारसंख्या 33 हजार 794 होती. चार वर्षांत प्रभागात दुपटीने मतदार वाढ झाली आहे.
प्रभाग क्रमांक 4 दिघी बोपखेलमध्ये 19 हजार 599 महिला, 22 हजार 833 पुरुष आणि 1 इतर असे एकूण 42 हजार 433 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत 36 हजार 666 मतदारांची संख्या होती. 5 हजार 767 मतदार वाढले आहेत. तर, प्रभाग क्रमांक 14. काळभोरनगर – आकुड़ींत 23 हजार 301 महिला, 26 हजार 987 पुरुष आणि इतर 1 असे 50 हजार 289 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत 45 हजार 704 मतदार संख्या होती. चार वर्षात 4 हजार 585 मतदार प्रभागात बाढले आहेत.
निवडणुकीवर करोनावाढीचा प्रभाव
पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकाही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ज्या प्रभागामध्ये नगरसेवकांचे निधन झाले आहे त्याठिकाणी निवडून येण्यासाठी काही इच्छुक कामाला लागले आहे. मात्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षपातळीवर हालचाली सुरू आहेत.