यान्गोन – म्यानमारमध्ये लोकशाही आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या गोळीबारात गुरुवारी आणखी 6 आंदोलक ठार झाले. आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात जबर जखमी झालेल्या एका आंदोलकाचा फोटो एका पत्रकाराने सोशल मिडीयवर पोस्ट केला आहे.
सुरक्षा दलांनी आंदोलकांवर बेछुट गोळीबार केला, असे अन्य एका आंदोलकाने आणि रुग्णालय कर्मचाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. आंदोलक शांततेने निषेध व्यक्त करत होते. तरिही सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, असे अन्य एका व्यक्तीने सांगितले.
पोलीस स्थानकासमोरच निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना लक्ष्य करण्यात आले होते. पोलिसांनी आगोदर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जमावावर रबरी गोळ्या मारल्या. त्यानंतर खऱ्या गोळ्या झाडल्या. त्यामध्ये किमान 6 जण ठार झाले असल्याचे अन्य आंदोलकांनी सांगितले.
म्यानमारच्या संसदेने गुरुवारी राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की आणि अध्यक्ष विन मिंट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. स्यू की यांनी सरकारमध्ये असताना 6 लाख डॉलरच्या बेकायदेशीर पेमेंट आणि अध्यक्ष मिंट यांनी यांनीही भ्रष्टाचाराच्या आरोपांची कबुली दिली आहे, असे संसदेच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले.
संयुक्त राष्ट्राकडून लष्करी राजवटीचा निषेध…
लष्क्करी राजवटीने आंदोलकांविरोधात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजारांपेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्स या गटाने दिली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने म्यानमारमधील लष्करी राजवटीवर तीव्र टीका करून आंदोलनविरोधी कारवाई तातडीने थांबवण्याची सूचना केली आहे. सुरक्षा परिषदेच्या या निवेदनावर चीनचीही स्वाक्षरी आहे.