ब्रासिलिया – ब्राझिलमध्ये बुधवारी पहिल्यांदाच एकाच दिवसात कोविडशी संबंधित 2 हजार मृत्यू झाले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने कोविड रुग्णांचा मृत्यू होण्याची ही ब्राझिलमधील पहिलीच वेळ आहे.
ब्राझिलमधील करोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला असल्याचे हे निदर्शक आहे. ब्राझिलमधील कोविडच्या संसर्गानंतर झालेल्या मृत्यूचा आकडा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अमेरिकेच्या तुलनेत ब्राझिलमध्ये एकूण 2,68,370 मृत्यू आहेत. अमेरिकेत 5 लाखापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझिलमध्ये बुधवारी 79,876 नवीन रुग्णांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. एकाच दिवसातील बाधितांच्या संख्येबाबतचा हा तिसऱ्या क्रमांकाचा उच्चांक आहे. अलिकडच्या काळातील रुग्णांची होणारी वाढ ही “पी-1′ नावाच्या विषाणूचा अत्यंत वेगाने होत असलेल्या फैलावामुळे झाली आहे. हा विषाणूलाच करोना विषाणूचा ब्राझिल-व्हेरिअंट असे संबोधले जाऊ लागले आहे.
या नवीन आणि अधिक घातक विषाणूच्या संसर्गामुळे बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनॉम घेब्रेयसियस यांनी ब्राझिलमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. प्रादेशिक पातळीवर उपाय योजनांचा वेग वाढवण्यात यावा असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी (दि. 11 मार्च) जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या साथीला जागतिक साथ म्हणून घोषित केले होते. जगभरात आतापर्यंत 10 कोटी 180 लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर 26 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.