पुणे – सिंहगड रस्त्यावरील् प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारे मंदिर आषाढी एकादशीसाठी सजले असले तरी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाणीचे साम्राज्य आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या समोरील बाजूलाच महापालिकेची आरोग्य कोठी असून या ठिकाणी दररोज 10 ते 12 कर्मचारी कामावर असतानाही परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झालेला असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, माजी नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी शनिवारी सकाळी या भागात जाऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पाहणी केली असून पुढील दोन दिवसात महापालिकेने तातडीनं उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपनार, कनिष्ठ अभियंता मोहीनी चालुक्य, प्रियंका महाले, आरोग्य निरीक्षक केतन निकम, मुकादम बाबा वाघमारे यावेळी उपस्थित होते.
चिखल आणि पाण्याची तळी
दरवर्षी आषाढी एकादशीला या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून एकादशीची तयारी सुरू असून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच पावसाने मंदिराच्या परिसरात पाण्याची तळी साचलेली असून कच्चा रस्ता चिखलात गेला आहे. एकादशीच्या दिवशी मंदिर परिसरात यात्रा भरते.
त्यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, एकदाशी अवघ्या काही दिवसांवर आलेली असली तरी महापालिकेकडून अद्यापही या भागात काहीच तयारी करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात माती पडल्याने चिखल झालेला आहे. तर नदीच्या बाजूला नव्याने सिमाभिंत बांधली असून त्याच्या समोरच मोठ्या प्रमाणात मातीचा राडारोडा टाकण्यात आलेला होता.