Vishakha Subhedar: अभिनेत्री विशाखा सुभेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचली. आपल्या विनोदी शैलीमुळे ती खास करून ओळखली जाते. विशाखा सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. कामाच्या अपडेटसह वैयक्तिक माहिती देखील ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतेच तिच्या घराचा सांभाळ करणाऱ्या मावशीने फ्लॅट खरेदी केला. याबाबत त्यांचे अभिनंदन करत विशाखाने एक पोस्ट शेअर केली होती. मात्र यावरून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
विशाखाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोद्वारे विशाखाने तिचे घर सांभाळणाऱ्या ताईंनी घर खरेदी केल्याचे सांगितले. सोबतच विशाखाने त्यांना केलेल्या मदतीबद्दलही भाष्य केले. पण यावरुन एका नेटकऱ्याने केलेल्या टिकेला विशाखाने सडेतोड उत्तर दिले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले होते की, “केलेली मदत सांगून नाही दाखवायची असे मला तरी वाटते. पण ती केलेली मदत व्यक्त करू शकते, माझे मत आहे. चुकले असेल तर क्षमस्व. पुढील मदतीसाठी शुभेच्छा”, असे त्या नेटकऱ्याने म्हटले.
त्यावर विशाखाने “ही मदत नव्हेच, माझ्या कुटुंबातील सदस्य तिची मेहेनत आणि त्यावरचा माझा आनंद ही post आहे, कुठेही मदत हा शब्द नाहीये. साथीदार आणि साक्षीदार असे शब्द आहेत. अचिएव्हमेन्टची पोस्ट आहे,” असे प्रत्युत्तर दिले. तिच्या या उत्तरावर त्या नेटकऱ्याने कमेंट करत विशाखाची माफी मागितली आहे. “क्षमस्व:मी माझी पोस्ट काढून टाकतो…माफी असावी”, असे नेटकऱ्याने म्हटले आहे. यावर तिचे अनेक चाहते तिला पाठिंबा देताना दिसत आहे.
View this post on Instagram
विशाखा सुभेदारची पोस्ट ?
“आज सकाळी माझ्या अंबरनाथ घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा “शोभा “तिचा फोन आला.. ताई good news आहे, (मला वाटलं पोराचा लग्नाची तारीख काढली असावी..!) मी म्हटलं “काय गं??” तर म्हणाली ताई… घर book केल 2 bhk.. खुप आनंद, उत्साहात सांगत होती.. मलाही खुप आनंद झाला.. अंबरनाथ west ला थोडं स्लम एरिया मध्ये रहाणारी, चौदा वर्षपूर्वी शोभा माझयाकडे जवळ जवळ रोज 40 मिनिट चालत कामाला यायची, तिची धावपळ आणि पोरांची काळजी म्हणून तिला माझ्या घरा जवळ मी भाडयाने घर घेऊन दिल, तर वाचलेल्या वेळेत तिने अजून एक ठिकाणी काम धरलं, पोरं मोठी झाली, शिक्षण झाले,” असे विशाखाने पोस्टमध्ये लिहिले.
पुढे तिने लिहिले की, “एकदा फ्रीज घायचा म्हणाली पगारातून एक हजार कापा, तुम्ही घेऊन दया फ्रिज.. आणि तिने फेडले पैसे.. धाडसी बाई..! तिच्या मुलांनी सुद्धा खुप कष्ट केले…10/12 वी नंतर कुठे कुठे छोटया-मोठ्या नोकऱ्या केल्या, घराला हातभार लावला, मग मोठा मुलगा उत्तम पगाराने कामाला लागला.. पुन्हा शोभाचा फोन.. ताई शुभम ला इतक्याइतक्या पगाराची नोकरी लागली…! पुन्हा फोन ताई लग्न ठरलं…! पुन्हा फोन..धाकटी पोर पास झाली..! तिची तिची अनेक शिखर तिने ओलांडली.. आज तिचा प्रवास पहिला की मलाच खुप समाधान मिळत .! तिच्या सगळ्या प्रवासाची मी साथीदार व साक्षीदार आहे..! माझ्याकडे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची प्रगती झाली की कोण कौतुक वाटत मला…! मग ती हेअर ड्रेसर असो किंवा स्पॉटबॉय असो किंवा ड्राइव्हर..!”
“माझ्याकडे स्पॉटबॉय म्हणून आलेला ‘शिवा’ त्याला मी क्लासला लावले, ड्रायविंग शिकवलं आणि त्याचा ड्राइव्हर झाल्यावर त्याला उत्तम पगाराची नोकरीं सुद्धा लागली. अर्थात त्याचे कष्ट आहेतच, पण मी फक्त एक मार्ग झाले ह्याचा मला आंनद होतों कायमच..! परमेश्वरानं एक खारीचा वाटा त्यांच्या यशात मला उचलायला सांगितला, माझ्या कडून ते करवून घेतलं हे त्या ईश्वराचे आभार… माझ्या शोभाचे खुप कौतुक”,”अशी पोस्ट विशाखा सुभेदारने केली होती.