नवी दिल्ली – भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ग्रेग चॅपेल यांनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक रोमांचक खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. तसेच दोन भारतीय खेळाडूंचाही या संघात समावेश आहे. विशेष म्हणजे हे दोन्हीही खेळाडू फलंदाज आहेत.
ग्रेग चॅपेल यांनी निवडलेल्या या संघात चार ऑस्ट्रेलियन, भारत, वेस्ट इंडिज प्रत्येकी दोन आणि पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व इंग्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. चॅपेल यांनी सलामीच्या जागी भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला स्थान दिले आहे. सेहवागची त्यांनी भरभरून स्तुती केली आहे. त्यांच्या मते सेहवागची दहशत सगळ्या संघांतील गोलंदाजांना होती. मात्र, सेहवाग कुठल्याही गोलंदाजाला घाबरायचा नाही.
याशिवाय भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीला देखील त्यांनी या संघात स्थान दिले आहे. ग्रेग चॅपेल यांनी सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे कौतुक केले. मात्र, संघात कोहलीला स्थान देणे पसंत केले. त्यांच्या मते कोहली ज्या-ज्या वेळी फलंदाजीसाठी उतरला, त्या-त्या वेळी करोडो भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे त्याच्या खांद्यावर होते.
ग्रेग चॅपेल यांनी या संघाचे नेतृत्व वेस्ट इंडीजचे महान अष्टपैलू खेळाडू सर गारफील्ड सोबर्स यांच्याकडे सोपवले आहे. त्यांनी भारताचा 1983चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव आणि फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांचीदेखील स्तुती केली. मात्र, त्यांना संघात स्थान दिले नाही. या संघात गोलंदाजांच्या जागेवर त्यांनी शेन वॉर्न, डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यासारख्या दिग्गजांचा समावेश केला आहे.
निवडलेला कसोटी संघ
वीरेंद्र सेहवाग, कॉलिन मिलबर्न, सर विवियन रिचर्डस, ग्रॅहम पोलाक, विराट कोहली, सर गारफील्ड सोबर्स, एडम गिलक्रिस्ट, वसीम अक्रम, शेन वॉर्न, डेनिस लिली आणि जेफ थॉमसन.