‘विराट कोहली’ला नवीन वर्षात मिळणार विक्रमांची संधी

मुंबई : भारतीय संघाचा ‘रनमशीन’ अशी ओळख असलेला आणि संघाचा कर्णधार विराट कोहली याला नवीन वर्षात जागतिक क्रिकेटमधील अनेक विक्रम नावावार करण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या मोसमात कोहलीने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

आता २०२० मध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची कामगिरी मागे टाकण्याची संधी त्याला मिळणार आहे. या विक्रमांपैकी अनेक विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने ३०९ सामन्यांतील ३०० डावांत १२ हजार धावा केल्या होत्या. कोहलीने २४२ सामन्यातील २३३ डावांत ११ हजार ६०९ धावा केल्या आहेत.

कोहलीच्या नावावर २४२ एकदिवसीय सामन्यात ४३ शतकांची नोंद आहे. तर तेंडुलकरच्या नावावर ४९ शतकांचा विक्रम आहे. तेंडुलकरची कामगिरी मागे टाकण्यासाठी कोहलीला केवळ ७ शतकांची गरज आहे.

कोहली याने आजपर्यत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक लगावले आहेत. तो सचिन (१००) आणि रिकी पाँटिंग (७१) यांच्यानंतर सर्वाधिक शतक झळकविण्याच्या यादीत तिस-या स्थानी आहे. रिकी पाॅंटिगचा विक्रम मागे टाकण्यासाठी कोहलीला केवळ २ शतकांची आवश्यकता आहे.

कसोटीमधील यशस्वी कर्णधाराचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने ५३ कसोटीत नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी ३३ वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे. कोहलीने आणखी ८ सामन्यांत नेतृत्व केल्यास तो धोनीला मागे टाकेल. धोनीच्या नावावर सर्वाधिक ६० कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम आहे.

भारतीय संघ नव्या वर्षात न्यूझीलंड दौ-यावर जात असून फेब्रुवारी महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटीमध्ये सर्वात जलद ८ हजार धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. संगकारा याने ९१ सामन्यातील १५२ डावात ८ हजार धावा केल्या होत्या. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर दुस-या स्थानावर ( ९६ सामन्यातील १५४ डाव) आहे. कोहलीने ८४ सामन्यात ७ हजार २०२ धावा केल्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.