कोहलीने तोडला प्रचंड रकमेचा करार

मुंबई – सॉफ्ट ड्रिंक व जंक फुड सोडल्यामुळे मी स्वतः पेप्सी पीत नाही मग त्यांच्याशी करारबद्धही राहावेसे वाटत नाही, असे सांगत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पेप्सीबरोबरचा सहा वर्षांचा प्रचंड रकमेचा करार मोडला आहे.

शारीरिक तंदुरुस्ती कायम राहावी यासाठी मी कोणतेही सॉफ्ट ड्रिंक पीत नाही व जंक फुडही खात नाही. मुळातच मला कधीही पेप्सी प्यावेसे वाटले नाही. त्यांच्याशी मी मानसिकरीत्या जोडलाच गेलो नाही. त्यामुळेच मी हा करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे कोहलीने सांगितले आहे.

स्वत: कोहली जर पेप्सी पीत नाही तर त्यांची जाहिरात का करतो, असा प्रश्‍न त्याला सोशल मीडियावर सातत्याने विचारला जात होता. अखेर कोहलीने हा करार मोडून या प्रश्‍नालाच सीमापार केले आहे.

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याच्या समोर ठेवण्यात आलेल्या कोकाकोलाच्या बाटल्या हटवल्या होत्या व समोर बसलेल्यांना पाणी प्या, असा सल्ला दिला होता.

यावरून कोकाकोला कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. हा वाद निवळत असतानाच आता कोहलीच्या भूमिकेमुळे सॉफ्ट ड्रिंक तयार करत असलेल्या कंपन्यांना यापुढे खेळाडूंना करारबद्ध करावे का, असा प्रश्‍न पडला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.