क्रिकेट काॅर्नर | टी-20 क्रिकेटमुळे तंत्र बिघडले

-अमित डोंगरे

भारत व न्यूझीलंड यांच्यातील कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेची अंतिम कसोटी लढत पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की टी-20 क्रिकेटच्या अती डोसमुळे कसोटीतील तंत्रशुद्ध फलंदाजीचा अस्त झाला आहे.

या कसोटी सामन्यात ज्या पद्धतीने भारतीय खेळाडूंनी फलंदाजी केली तिच्यावर चांगलीच टीकाही झाली. मात्र, न्यूझीलंडनेही पहिल्या डावात केलेली फलंदाजी पाहतानाही हेच जाणवत होते की दोष एकाच संघाचा नसून टी-20 क्रिकेटच्या भडिमाराचा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्विंगर किंवा शॉर्ट ऑफ गुड लेंग्थ चेंडूला आदर दाखवला जातो. मात्र, या सामन्यात याच चेंडूवर चौकार मारण्याची स्पर्धा पाहायला मिळाली हे सगळे टी-20 मुळे झालेले बदल आहेत. धावा येणे महत्त्वाचे आहे त्या कशा येतात हे महत्त्वाचे नाही, हे टी-20 क्रिकेटचे ब्रीदवाक्‍य आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये हे पाहायला मिळेल असे कधी वाटले नव्हते. कसोटी क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध फलंदाजी अपेक्षित असते या कल्पनेलाच आता धक्‍का बसत आहे. मुळातच कसोटी क्रिकेटची लोकप्रियता एकदिवसीय सामन्यांमुळे काहीशी कमी होत होती. त्यातच टी-20 क्रिकेटच्या उदयानंतर कसोटी क्रिकेट हवेच कशाला असे विचारण्यापर्यंत मजल गेली.

एकदा भारताच्या एका माजी कसोटी क्रिकेटपटूच्या अकादमीत एक मुलगा आपल्या पालकांसह आला व त्यांनी या खेळाडूला असे काही सांगितले की त्यामुळे त्या अकादमीचा मालक असलेल्या खेळाडूने डोक्‍याला हात लावला. हे पालक म्हणाले होते की, आमचा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही खेळला तरीही चालेल. मात्र, त्याला आयपीएलमध्ये खेळायला मिळेल असा खेळाडू बनवा. यावर काय बोलावे हेच त्याला कळेनासे झाले. ही केवळ याच एका खेळाडूबाबत नाही तर आजच्या काळात जवळपास प्रत्येक पालकांचे हेच स्वप्न आहे की आपल्या मुलाने आयपीएल खेळावे म्हणजेच टी-20 क्रिकेटचा किती अतिरेक होत आहे हे लक्षात येते. याच मुशीतून कसोटी दर्जाचे फलंदाज कसे तयार होणार.

पूर्वी कसोटी सामन्यात एका दिवसात 180 ते 230 धावा झाल्या की उत्तम कामगिरी मानले जात होते. ऑस्ट्रेलियाने दिवसात तीनशे धावा काढायला सुरुवात केल्यावर तंत्र काहीसे बाजूला पडले. मात्र, आज जगातील कसोटी खेळणारा प्रत्येक संघ दिवसात साडेतीनशे धावांची अपेक्षा करतो हे टी-20 मुळेच शक्‍य आहे. कारण कसोटीत एकदा चौकार फटकावली की पुन्हा चौकार पाहण्यासाठी कित्येक षटके वाट पाहावी लागत होती. आता प्रत्येक षटकात चौकार मारणारे फलंदाज दिसतात.

अर्थात, क्रिकेटचा खेळ तंत्रावरच आधारित आहे त्यामुळे कसोटी खेळणारे अनेक फलंदाज टी-20 मध्येही यशस्वी होतात तर टी-20 च्या आहारावर पोसलेले काही खेळाडू कसोटीतही यश मिळवतात. जेव्हा वीरेंद्र सेहवागने पदार्पण केले तेव्हा तो मर्यादित षटकांच्याच सामन्यासाठी बनला असल्याचे बोलले जात होते. मात्र, कसोटीत त्रिशतक साकार करत अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्याचा विक्रम त्याने साकार केला.

असो, मूळ मुद्दा वेगळा आहे, या कसोटीतील फलंदाजी पाहिली की असे वाटते या सामन्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू मानसिकरित्य तयारच नव्हते. कारण दोन्ही संघांतील फलंदाजांची बाद होण्याची पद्धत कसोटी क्रिकेटला नवीन होती, हे मूळ तंत्राशी फारकत घेतल्यामुळेच घडत आहे पण त्याची कोण काळजी करणार. कारण टी-20 मुळे कसोटीतील तंत्रशुद्ध फलंदाजी अस्तंगत झाली हे जागतिक सत्यवचन आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.