पुणे – सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमुळे लसीकरणाविषयी लाभार्थ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. लस घेतल्यानंतर आपल्याला काही होणार नाही ना, अशी भीती त्यांना सतावत आहे. लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वयोगटाच्या पुढे असलेल्या को-मॉर्बिड व्यक्तींची सध्या गर्दी होत आहे. मात्र, सोशल मीडियावर लसीकरणासंबंधी पसरवल्या जाणाऱ्या उलट सुलट व्हिडिओंमुळे अनेकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी फॅमिली फिजिशियन आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांना विचारणा करण्याला सुरुवात केली आहे.
लस कमी कालावधीत निर्माण झाल्याने त्याविषयी खात्री अनेकांना नाही, ज्यांना आधीच किडणीचे आजार आहेत त्यांचा आजार लस घेतल्यामुळे अधिकच बळावेल, लसीमुळे कॅन्सर होईल, हृदयविकार होईल, ब्रेन स्ट्रोक होईल, न्युरॉलॉजिकल प्रॉब्लेम्स होतील अशा अनेक शंका कुशंका मनात येत आहेत. या शंकांचे मूळ मोबाइलच्या माध्यमातून सध्या वेगाने व्हायरल होत असलेले दिशाभूल करणारे व्हिडिओ आहेत.
याशिवाय धुम्रपान, मद्यपान करणाऱ्यांनाही ही लस घेतल्यास धोका निर्माण होऊ शकतो, असेही काही फेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशा दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमधील माहितीची शहानिशा करायला काहीजण गूगलचा आधार घेत असून, त्यातूनही अशीच माहिती पुढे येत आहे. त्यामुळे लस घ्यावी की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात येत आहे.
45 वर्षे वयापुढील आजारी व्यक्तींनाही याबाबत अनेक प्रश्न पडले असून, नपुंसकत्त्व येते, स्त्रियांमध्ये वंध्यत्त्व येते, डीएनए बदलतो, असलेला आजार आणखी बळावतो, हृदयरोगींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतील. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडू शकते. रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत असल्यामुळे या लसीचा उलटा परिणाम होतो, आदी प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. फॅमिली फिजिशियन किंवा विविध रोगाचे तज्ज्ञ त्या संदर्भात समुपदेशन करत आहेतच परंतु ससूनच्या मानसोपचार विभागानेही सुरू केलेल्या हेल्पलाइनवरून या प्रश्नांची उत्तरे दिली जात आहेत.
लसीकरणासंदर्भात आमच्याकडेही समुपदेशनासाठी कॉल येत आहेत. दिवसाला सुमारे 12 ते 15 कॉल्स आम्ही हेल्पलाइनच्या माध्यमातून घेतो. यामध्येही लस का घ्यावी, घेतली तरी कोविड होणार मग का घ्यावी, त्याची खात्री काय, त्याचे साइड इफेक्ट काय यासह अनेक प्रश्न आम्हांला विचारले जात आहेत. शास्त्रोक्तदृष्ट्या अधिकृत उत्तर आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो.
– डॉ. नितीन अभिवंत, मानसोपचार विभाग प्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय