अग्रलेख : वर्चस्वाची लय कायम राहावी

भारतीय संघाने करोनाचा धोका कमी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थाटात पुनरागमन केले. अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आणि तिथूनच भारतीय संघाच्या वर्चस्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हीच लय कायम राहावी अशी अपेक्षा आहे. कारण पुढील काळात जवळपास दिवाळीपर्यंत भारतीय संघ सातत्याने क्रिकेटच्या तीनही प्रकारात प्रचंड व्यस्त असणार आहे. 

सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयी होऊन टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यानंतर लगेचच एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे. करोनामुळे जवळपास एक वर्ष वाया गेल्यानंतरही खेळाडूंनी अथक प्रयत्न व कामगिरी करत यशाची एकेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. आखातातील करोनाचा धोका कमी झाल्यामुळे तिथेच आयपीएल स्पर्धा रंगली. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. हा दौरा भारतीय संघाची नवी ओळख करून देणारा ठरला. संघाची अवस्था अत्यंत बिकट झाल्यानंतर तळातील फलंदाजांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत ही मालिका यशस्वी केली. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात परतला व लगेचच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ झाला. चेन्नईतील कसोटीद्वारे या मालिकेला प्रारंभ झाला व ऑस्ट्रेलियात वर्चस्व गाजवलेला हाच संघ का, असा प्रश्‍न पडावा अशी कामगिरी आपल्या संघाने केली. 

लाल मातीच्या खेळपट्टीवर इंग्लंडने आपला पराभव केला व मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघावर टीका सुरू झाली. यातून बोध घेत संघाने कात टाकली व त्यानंतरचा भारतीय संघ काही वेगळाच दिसून आला. दुसरा कसोटी सामना जिंकत संघाने मालिकेत बरोबरी केली तसेच त्यानंतरच्या दोन कसोटी जिंकत भारताने ही मालिका 3-1 अशी खिशात टाकली. आता हेच दोन संघ टी-20 मालिकेसाठी समोरासमोर उभे ठाकले आहेत. प्रस्थापित खेळाडूंना शह देत संघातील नवोदितांनी अफलातून कामगिरी करत कसोटी मालिका गाजवली व आता त्यातीलच काही खेळाडूंना क्रिकेटच्या या वेगवान प्रकारासाठी संघात स्थान दिले गेले. तसे पाहिले तर सध्या कसोटी क्रिकेट जरी पाच दिवसांचे असले तरी सामने प्रत्यक्षात पाच दिवस चालत नाहीत. 

गुलाबी चेंडूने खेळलेली प्रकाशझोतातील कसोटी तर चक्‍क दोनच दिवसात संपली. त्यामुळे कसोटीचा दर्जा खालावला असे न म्हणता फलंदाजीचा दर्जा खालावला असेच म्हणावे लागेल. दिवस दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून बसणाऱ्या फलंदाजांचा काळ लोप पावला की काय, असा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाला. केवळ भारत व इंग्लंड यांच्यातीलच कसोटी दोन दिवसांत संपली असे नाही तर त्याचवेळी झिम्बाब्वेनेही अफगाणिस्तानला दोन दिवसात हरविले. म्हणजे केवळ भारतीय संघात कसोटीचे स्पेशालिस्ट फलंदाज नाहीत असे नव्हे तर हा जागतिक प्रश्‍न बनला आहे. राहुल द्रविडसारखे फलंदाज आता जन्मालाच येत नाहीत का, अशीच आज कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांची स्थिती बनली आहे. एखादा ज्यो रूट, केन विल्यमसन, चेतेश्‍वर पुजारा यांचे अपवाद वगळले तर खुद्द विराट कोहली देखील पारंपरिक कसोटी फलंदाज आहे असे म्हणता येणार नाही. 

बरे कसोटी क्रिकेटसाठी पूर्वी जशा खेळपट्ट्या तयार केल्या जात होत्या त्यातही आता बदल झाला आहे. यजमान देशांचे संघ व त्यांचा कर्णधार आपल्या खेळाडूंना फायदा होईल अशाच खेळपट्ट्या तयार करण्याच्या सूचना देतो. याचे एक कारणही आहे. जगातील कोणत्याही देशाच्या कर्णधाराला मायदेशातच मालिका गमावण्याचा धोका पत्करण्याची इच्छा नसते. पूर्वी ऑस्ट्रेलियातील पर्थ, इंग्लंडमधील लॉर्ड्‌स किंवा एजबस्टन, न्यूझीलंडमधील बेसिन रिझर्व्ह, दक्षिण आफ्रिकेतील वॉंडरस आणि वेस्ट इंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिनाद या मैदानावरील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीला पोषक अशाच तयार केल्या जात होत्या. पर्थच्या खेळपट्टीबाबत तर असे म्हटले जात होते की, “फास्टेट विकेट ऑन अर्थ, कॉल्ड पर्थ’. पण कालांतराने वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासारखे वेगवान गोलंदाज फारसे तयार होणे बंद झाले व अशा खेळपट्ट्याही बदलल्या. 

एक शेन वॉर्न पदार्पण करता झाला व पर्थची खेळपट्टीही फिरकी गोलंदाजीला साथ देणारी तयार होऊ लागली हाच कसोटी क्रिकेटच्या ऱ्हासाचा क्षण ठरला होता. कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट, यातच खेळाडूच्या संयमाचा, जिद्दीचा व तंत्रशुद्धतेचा कस लागतो असे म्हटले जात असले तरीही आज फास्टफूडचा जमाना असल्यामुळे पाच-पाच दिवस चालणारे रटाळ क्रिकेट कोणालाच नको झाले आहे. त्यामुळे टी-20 सामना लोकप्रिय होत आहेत. आशातच आता भारतीय संघ यंदाच्या वर्षात कसोटी किंवा एकदिवसीय सामने अत्यंत कमी खेळणार असून टी-20चे सामने जास्त खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यावर लगेचच आयपीएल स्पर्धा आहे, त्यानंतर आशिया करंडक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर भारतातच टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना सातत्याने सामने खेळायचे आहेत. आता प्रश्‍न येतो तो गुणवत्तेचा. मात्र, टी-20 क्रिकेटमध्ये गुणवत्ता पाहिली जात नाही, तर त्या खेळाडूने कशी कामगिरी केली हे पाहिले जाते. 

पूर्वी समीक्षक म्हणायचे की चेंडू बॅटच्या बरोबर मध्यभागी लागला तर फलंदाजाचे तंत्र चांगले आहे. आता टी-20 क्रिकेटमध्ये तंत्राचा फार कोणी विचार करत नाही. फलंदाजाने कसाही चेंडू टोलावला किंवा चेंडू बॅटच्या कडेला लागून जरी चौकार गेला तरी त्यात कोणालाही वावगे वाटत नाही. खुद्द विक्रमादीत्य सुनील गावसकर एकदा म्हणाले होते, की टी-20 क्रिकेटमध्ये धावा येणे महत्त्वाचे आहे, त्या कशा येतात हे महत्त्वाचे नाही. त्यामुळेच बिग हिटर्सला या क्रिकेटमध्ये नको इतके महत्त्व आले आहे. इथे तुम्ही चेंडू प्लेड करून वाया घालवला तर तो मोठा गुन्हा ठरतो. सध्या याच क्रिकेटकडे प्रायोजकही मोठ्या संख्येने येतात. कारण झटपट क्रिकेटमध्ये जास्त पैसा गुंतवला तरी त्याचे रिटर्नही लवकर व भक्‍कम येतात. कसोटी क्रिकेट आजही जिवंत राहिले आहे ते इंग्लंड व ऑस्ट्रेलिया याच संघांमुळे. ऍशेस मालिका त्यांच्यासाठी विश्‍वकरंडक स्पर्धेपेक्षाही जास्त महत्त्वाची असते. त्यामुळेच कसोटी व मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी त्यांचे संघातील खेळाडू बदलतात. 

येत्या काळात कसोटी फलंदाज तरी तयार होतील का, असा प्रश्‍न पडावा अशी परिस्थिती आहे. टी-20 च्या आहारावर पोसलेल्या क्रिकेटपटूंकडून ती अपेक्षा करणेही योग्य ठरणार नाही. मात्र, आताच्या भारतीय संघाच्या कामगिरीबाबत बोलायचे झाले तर संघाने विजयाच्या मार्गावर प्रवास करताना वाटेत आलेले सगळे अडथळे कसोटी मालिकेत दूर केले आहेत. आता इंग्लंडच्या दौऱ्यावर गेल्यावरच आपण कसोटी सामने खेळणार आहोत. तोपर्यंत झटपट क्रिकेटचेच सामने जास्त खेळायचे आहेत. कसोटीतील वर्चस्वाची लय मर्यादित षटकांच्या सामन्यांतही कायम राहावी हीच आता अपेक्षा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.