पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 11 एप्रिलपासून प्रथम सत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यात प्रात्यक्षिकचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षेचे गुण जाहीर होतील, परंतु प्रात्यक्षिक न झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल मात्र दुसऱ्या सत्राच्या परीक्षेनंतरच मिळणार आहेत. म्हणजेच प्रथम सत्राची परीक्षा होत असली, तरी प्रात्यक्षिक असलेल्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
या परीक्षांचे वेळापत्रक दि. 25 मार्चपर्यंत प्रसिद्ध होईल. विद्यापीठाने परीक्षांचे नियोजन सुरू केले आहे. सर्व अभ्यासक्रमांच्या विषयांच्या लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने प्रत्येकी 50 गुणांच्या होतील. त्यादृष्टीने प्राध्यापकांकडून प्रश्नसंच तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण अजूनही प्रश्नसंच परीक्षेपूर्वी वेळेत उपलब्ध होतील, याविषयी साशंकता आहे.
प्रात्यक्षिकचा समावेश नसलेल्या बी.कॉम., एम.कॉम., बी.ए., एम.ए. या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा होतील. त्यानुसार निकालही जाहीर होतील. मात्र बी.एस्सी., एम.एसस्सी.सह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या नाहीत. त्यांच्या लेखी परीक्षा होतील. त्याचे गुण जाहीर होतील. अंतर्गत प्रात्यक्षिकचे गुण उपलब्ध नसल्याने त्यांना निकाल देता येणार नाही. त्यामुळे त्यांचा एकत्रित निकालासाठी द्वितीय सत्रापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गुणपत्रिकाही एकत्रच
करोनामुळे महाविद्यालये बंद होती. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दि.22 डिसेंबर 2020 रोजी परिपत्रक प्रसिद्ध करून, त्यात प्रात्यक्षिकच्या परीक्षा प्रत्यक्ष विद्यार्थी नसल्यामुळे घेणे शक्य नाही. त्यामुळे प्रात्यक्षिकच्या दोन्ही सत्रांतील परीक्षा एकत्रितपणे द्वितीय सत्राच्या परीक्षेसोबत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रात्यक्षिकसह द्वितीय सत्रातील परीक्षा झाल्यानंतर मूळ गुणपत्रिका दिल्या जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
प्रात्यक्षिकची परीक्षा अशक्य?
फेब्रुवारी महिन्यात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असल्याने दि. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने एक आठवड्यात पुन्हा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. किमान 15 दिवसांचा अवधी मिळाला असली, तरी प्रात्यक्षिक पूर्ण करणे शक्य होते. सद्यस्थितीत पाहता प्रत्यक्ष महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकची परीक्षा होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राची लेखी परीक्षा होतील. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षा द्वितीय सत्राच्या अखेरीस घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक असलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षेचे गुण जाहीर केले जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाकडून त्याचे गुण प्राप्त झाल्यानंतर एकत्रित निकाल आणि मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
डॉ. मनोहर चासकर,
अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ