पॅरिस : फ्रान्समध्ये हिंसाचार उफाळला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर पॅरिसमध्ये पोलिसांनी गोळीबार केला त्यानंतर पोलीस आणि सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मागच्या पाच दिवसांपासून मार्सेल या शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक सुरु आहे.
पॅरिसच्या उपनगरात मंगळवारी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी १७ वर्षीय नाहेल एम. नावाच्या मुलावर गोळीबार केला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सरकार आणि पोलिसांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उफाळला. या घटनेच्या निषेधार्थ पॅरिस उपनगरात आणि फ्रान्समधील रस्त्यावर नागरिक उतरले आहेत.
अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांकडून गाड्यांची जाळपोळ, इमारती आणि दुकानांची लुटमार सुरु आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रू धुरांचा वापर केला आहे. शनिवारी फ्रान्समध्ये सुमारे ४५ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी ९०० आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती.
शुक्रवारी १३०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. पॅरिसमध्ये लुई व्हिटॉनसारख्या ब्रँडची दुकाने आंदोलकांकडून लूटण्यात येत आहेत. झारा, अॅपल आणि नायकीसारख्या ब्रँडच्या दुकानांचीही लूट आंदोलकांनी केली आहे.